
छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल, (हिं.स.)। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएसआर फंडातून महापालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाला १ कोटी २० लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेच्या १० शाळांचे वीजबिल आता शून्य होणार आहे. आरोग्य विभागालाही आधुनिक वैद्यकीय उपकरणे मिळणार आहेत. त्यामुळे निदान आणि उपचारात गती येऊन त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे.
एसबीआयच्या विभागीय परिषदेत बँकेचे चेअरमन चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली. यावेळी महापालिकेचे शिक्षण उपायुक्त अंकुश पांढरे व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधीचे
वितरण करण्यात आले.
महापालिकेच्या १० शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी एसबीआयने ४८ लाख रुपये राखीव ठेवले आहेत. या प्रकल्पामुळे या शाळांचा वीज खर्च पूर्णपणे वाचणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी बँकेने दिलेल्या निधीतून ५ शाळांमध्ये हे प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यात आले असून, त्यांचे वीजबिल वर्षभरापासून शून्य येत असल्याची माहिती उपायुक्त अंकुश पांढरे यांनी दिली. आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी ७० लाख रुपये देण्यात आले आहेत. यातून थैलेसेमिया आणि सिकलसेल अॅनिमियाच्या तपासणीसाठी ४ अत्याधुनिक मशिन, ८ हजार टेस्टिंग किट्स आणि एक अद्ययावत सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. शाळांमधील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis