
डोंबिवली, 22 एप्रिल, (हिं.स.)। एमआयडीसी निवासी मध्ये सद्या गटारी, नाले, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यांची कामे एमआयडीसी ठेकेदाराकडून चालू आहेत. त्या कामात अनेक त्रुटी आहेत. ही कामे चुकीच्या, धोकादायक पद्धतीने आणि निष्काळजीपणे चालू असून नियोजन अभावी नवीन काँक्रीट रस्ते तोडणे, वीज, गॅस, पाणी इत्यादी वाहिन्यांना नुकसान पोहचविणे असे प्रकार घडत आहेत या कारभारा विरोधात एमआयडीसी निवासी मधील विविध समस्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आंदोलन करणार आहे.
एमआयडीसी निवासी मधील मॉडेल स्कुल, भाजी गल्ली, शिवाईबालक शाळा असे काही मोजक्याचं रस्त्यांचे काँक्रीटीकरण अद्याप करण्यात आले नाही. एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. काही वेळा तर पाणी येतच नाही. अशा विविध समस्येने निवासी मधील नागरिक त्रस्त झाले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेला विविध घरपट्टी कर भरूनही स्वच्छता, कीटकनाशक फवारणी, धुरीकरण इत्यादी नियमित होतांना दिसत नाही. या तीव्र समस्येबद्दल प्रशासनाच्या विरोधात जनतेत रोष निर्माण झाला असून यासाठी एखादे मोठे आंदोलन हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे घेण्यात येणार आहे. प्रशासनाला यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून मोर्चा उपोषण अशा प्रकारचे लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत.
एमआयडीसी ठेकेदाराच्या मनमानी आणि निष्काळजी कामाबद्दल निवासी मधील काही संघटनांनी यापूर्वी एमआयडीसीला पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे असेही समोर येत आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi