
सोलापूर, 22 एप्रिल, (हिं.स.)। सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत, शहरातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट आणि हृदयविकार तज्ज्ञ डॉ. बसवराज सुतार यांना लखनौ येथे पार पडलेल्या CSI NIC च्या वार्षिक परिषदेत ‘Shining Star Award 2026’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हृदयविकार क्षेत्रातील उत्कृष्ट आणि परिणामकारक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, डॉ. सुतार यांच्या या यशामुळे सोलापूरसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हन्नूर येथून येत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत डॉ. सुतार यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे.
शैक्षणिक प्रवासात त्यांनी सोलापूर येथील डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केले. त्यानंतर दिब्रुगढ येथून MD (मेडिसिन), कोइम्बतूर येथून DNB (कार्डिओलॉजी) आणि हैदराबाद येथील AIG हॉस्पिटलमध्ये प्रख्यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रोफिजिओलॉजीचे सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले. सध्या डॉ. सुतार हे सोलापूर व पंढरपूर येथे ‘हृदय स्पंदन हार्ट केअर’ क्लिनिक, अश्विनी रुग्णालय तसेच यशोधरा रुग्णालय येथे रुग्णसेवा देत आहेत. ते सोलापूर आणि परिसरातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट असून, हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता (अरिथमिया) यांसारख्या गुंतागुंतीच्या विकारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात त्यांना विशेष प्रावीण्य आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड