
सोलापूर, 22 एप्रिल (हिं.स.)।
यंदा भीमा नदीतून एकदाच पाणी सोडण्यात आले आहे. आता भीमा नदी पात्र कोरडेठाक असून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा देखील कोरडा पडला आहे. भीमेतून पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. अधीक्षक अभियंत्यांनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाला पाठविला आहे.
आगामी हंगामात पावसाचे प्रमाण असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत यंदा एकदाच पाणी सोडले आहे. आता उन्हाचा तडाखा वाढल्याने भीमा नदीकाठ तहानला आहे. शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडण्याची मागणी वारंवार केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही पाणी सोडले जाईल, असे आश्वस्त केले आहे.
त्यानुसार सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुवीरेंद्र सखाराम खांडेकर यांनी जलसंपदा विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास मान्यता द्यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मात्र, जलसंपदा विभागाने अजून त्याला मंजुरी न दिल्याने भीमा नदीत पाणी कधी सोडले जाणार, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.
मागच्या वर्षी २२ एप्रिल रोजी उजनी धरणात ६१.१२ टीएमसी पाणी होते. धरणात उपयुक्त पाणीसाठा उणे ४.७३ टक्के होता. यंदा मंगळवारी (ता. २१) उजनीत ७७.१५ टीएमसी पाणी असून उपयुक्त पाणीसाठा २५.१८ टक्के (१३.४९ टीएमसी) आहे. सध्या शेतीसाठी कालव्यातून, बोगद्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड