नेरपिंगळाईत पाणीटंचाईचा तीव्र उद्रेक; ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप
अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) : परिसरातील पाणीप्रश्नाने आता गंभीर आणि आक्रमक वळण घेतले असून नेरपिंगळाई येथे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अप्पर वर्धा धरण येथून पिंगळादेवी गढावरून सावरखेड-नेरपिंगळाई मार्गे पाणीपुरवठा केला जात असला
नेरपिंगळाईत पाणी संकट लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी अप्पर वर्धाचा पुरवठा अपुरा, मात्र सात-आठ दिवसांनी मिळते पाणी


अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) : परिसरातील पाणीप्रश्नाने आता गंभीर आणि आक्रमक वळण घेतले असून नेरपिंगळाई येथे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अप्पर वर्धा धरण येथून पिंगळादेवी गढावरून सावरखेड-नेरपिंगळाई मार्गे पाणीपुरवठा केला जात असला, तरी प्रत्यक्षात गावकऱ्यांना सात ते आठ दिवसांनीच पाणी मिळत असल्याची धक्कादायक स्थिती आहे.

सध्या केवळ १० ते १२ तास पाणीपुरवठा होत असून तो अत्यंत अपुरा ठरत आहे. त्यामुळे आणखी किमान पाच तास पाणीपुरवठा वाढवावा, अशी मागणी जलप्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विहिरी आणि बोअरवेल यांसारखे स्थानिक जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडले असून, संपूर्ण गावाचा भार धरणाच्या पाण्यावर आला आहे.

दरम्यान, सावरखेड-नेरपिंगळाई मार्गावरील मुख्य जलवाहिनीवर ठिकठिकाणी गळती होत असून एअर व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. हजारो लिटर पाणी नष्ट होत असताना गावातील नळ कोरडे राहणे, ही परिस्थिती संतापजनक ठरत आहे. काही ठिकाणी जलवाहिनी जाणीवपूर्वक फोडल्याचे प्रकारही समोर आले असून त्यामुळे पाण्याचा दाब कमी होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही.

प्रशासनाकडून देखरेख आणि दुरुस्तीबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे समस्या अधिकच गंभीर झाली आहे. याशिवाय, भूतकाळातील निर्णयांमुळेही ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे. मागील पंचवार्षिक योजनेत नया वाठोडा येथे ग्रामपंचायत विहिरीचे काम सुरू झाले होते; मात्र राजकीय विरोधामुळे ते अर्धवट राहिले. ती विहीर पूर्ण झाली असती, तर आजची भीषण पाणीटंचाई टळली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गावातील अनेक भागांत आठवडाभर नळ कोरडे राहत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या सर्व परिस्थितीतही ग्रामपंचायतीकडून पूर्ण वर्षाचा पाणीकर वसूल केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पाणी नाही, पण बिल मात्र पूर्ण — हा कसला न्याय?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

नेरपिंगळाईतील पाणीप्रश्न हा केवळ तांत्रिक बिघाड नसून नियोजनाचा अभाव, दुर्लक्ष आणि चुकीच्या निर्णयांचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. तातडीने गळती दुरुस्ती, पाणीपुरवठ्यात वाढ, पर्यायी जलस्रोतांची उभारणी आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा, हा जनआक्रोश अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

दरम्यान, ग्रामविकास अधिकारी विनोद मनवर यांनी सांगितले की, “सध्या १०-१२ तास पाणीपुरवठा होत असला, तरी तो अपुरा आहे. आणखी पाच तास वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. उन्हाळ्यामुळे इतर सर्व पाण्याचे स्रोत बंद पडल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.”

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande