
पुणे, 22 एप्रिल, (हिं.स.)। सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे, युनेस्को पॅरिसच्या सहकार्याने, महिला सक्षमीकरणासाठी 'जेंडर इन्क्लुजन आणि स्किल डेव्हलपमेंट' (लिंग समावेशकता आणि कौशल्य विकास) या विषयावरील आशियातील पहिल्या युनेस्को चेअरचे उद्घाटन करून भारताच्या शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे.
या युनेस्को चेअरचे अधिकृत उद्घाटन मुख्य अतिथी श्री. जयंत चौधरी, माननीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच राज्यमंत्री, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या हस्ते शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. हे उद्घाटन युनेस्कोच्या सहकार्याने SSPU कॅम्पस, किवळे, पुणे येथे आयोजित “विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क” या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान केले जाईल.
या उपक्रमाचे नेतृत्व SSPU च्या प्रो-चान्सलर आणि युनेस्को चेअरहोल्डर डॉ. स्वाती मुजुमदार करत आहेत.
डॉ. मुजुमदार या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य विकास धोरण तज्ज्ञ, B20 टास्क फोर्सच्या सदस्य आणि प्रतिष्ठित फुलब्राइट-नेहरू (FINEAS) ग्रांट (२०२४-२०२५) च्या मानकरी आहेत.
हा ऐतिहासिक उपक्रम कौशल्य परिसंस्था, तांत्रिक शिक्षण आणि कार्यबलाची सज्जता बळकट करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारताला अग्रस्थानी नेणारा आहे. युनेस्को पॅरिसच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झालेली ही चेअर, कौशल्य-आधारित शिक्षण आणि रोजगाराला चालना देण्यासाठी, विशेषतः महिलांचा कार्यबलातील सहभाग वाढवण्यासाठी एक 'सेंटर ऑफ एक्सलन्स' आणि जागतिक ज्ञान केंद्र म्हणून कार्य करेल. ही परिषद एआय (AI), सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स टेक यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कौशल्य विकासाच्या भूमिकेवर भर देईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु