योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये 'एआय' आणि 'इलेक्ट्रिकल' इंजिनिअरिंगला एआयसीटीईची मान्यता
बीड, 22 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकने तंत्रशिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाविद्यालयात ''इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग'' आणि ''आ
योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये 'एआय' आणि 'इलेक्ट्रिकल' इंजिनिअरिंगला एआयसीटीईची मान्यता


बीड, 22 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकने तंत्रशिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाविद्यालयात 'इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग' आणि 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग' हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) मान्यता दिली आहे. प्राचार्य रमण देशपांडे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या महाविद्यालयात पूर्वीपासूनच ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या राबवले जात असून या सर्व शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) 'उत्कृष्ट' असे मानांकन दिले आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या दूरदृष्टीतून २०११ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने अल्पावधीतच आपला १५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत तंत्रनिकेतन म्हणून या संस्थेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून येथील अनेक विद्यार्थी आज शासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक आणि कुशल अभियंते म्हणून देश-विदेशात कार्यरत आहेत.

नवीन अभ्यासक्रमांच्या मान्यतेमुळे सध्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष गणपत व्यास, कार्याध्यक्ष जगदीशराव चौसाळकर, सचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य, सहसचिव प्रा. भीमाशंकर शेटे आणि संचालक प्रताप पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी महाविद्यालयाचे आणि प्राचार्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande