
पुणे, 22 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व व्यक्ती व संस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (एनएफडीपी) पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अर्चना शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद तसेच मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी अनिवार्य आहे. ही नोंदणी संबंधित संकेतस्थळावर स्वतः किंवा जवळच्या सीएससी केंद्रात आधारकार्ड व बँक पासबुकसह विनामूल्य करता येणार आहे. तसेच ई-श्रम कार्ड नोंदणीही संबंधित संकेतस्थळावर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याशिवाय किसान क्रेडिट कार्ड व अपघात गट विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, हडपसर, पुणे येथे संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु