कानठळ्या बसल्यानेच संजय राऊत यांची विराट महिला मोर्चावर टीका - नवनाथ बन
मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)। भाजपाने काढलेल्या महिलांच्या विराट मोर्चातील आक्रोशामुळे कानठळ्या बसलेल्या जनाब संजय राऊत यांनी महिला शक्तीला विरोध करण्याच्या नादात महिलांसोबत जातीवाचक शब्दाचाही उल्लेख करत त्या समाजाचाही अपमान केला आहे. अशा पद्धतीचे शब
नवनाथ बन यांचा प्रहार


मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)। भाजपाने काढलेल्या महिलांच्या विराट मोर्चातील आक्रोशामुळे कानठळ्या बसलेल्या जनाब संजय राऊत यांनी महिला शक्तीला विरोध करण्याच्या नादात महिलांसोबत जातीवाचक शब्दाचाही उल्लेख करत त्या समाजाचाही अपमान केला आहे. अशा पद्धतीचे शब्द वापरण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. नारीशक्तीचा अपमान करण्याचे काम महाविकास आघाडीकडून केले जात आहे. मात्र देशातील नारीशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला. दुर्दैवाने काँग्रेसची प्रवक्तेगिरी करत समर्थन करण्याचे काम जनाब संजय राऊतांकडून सुरू आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि दहशतवादी कोण आहेत हे देशाने पाहिले आहे. ज्या पुलवामात दहशतवादी घटना घडली त्या पुलवामाचे समर्थन काँग्रेसने केले होते. दहशतवाद्यांना कंठस्नान घालत यमसदनी पाठवण्याचे काम आपल्या भारतीय सैनिकांनी आणि मोदी सरकारने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी नाहीत तर देशभक्त आहेत. तुमच्यासारख्या देशद्रोह्यांना ते नेहमीच धडा शिकवतात म्हणून तुम्हाला ते दहशतवादी वाटत असतील तर 140 कोटी जनतेला ते देशभक्त आणि प्रधानसेवक वाटतात, असे श्री. बन यांनी सुनावले.

पैसे देऊन मोर्चाला लोकं बोलावणे हे महाविकास आघाडीत, उबाठा गटामध्ये होते. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, नारीशक्तीची पार्टी आहे. नारी शक्तीच्या सन्मानासाठी मोर्चा असल्याने सर्वसामान्य मुंबईकर या महिला मोर्चात सहभागी झाला होता. तुम्ही मात्र सातत्याने पंधराशे रुपयांचा उल्लेख करत लाडक्या बहिणींचा विरोध करत आहात. लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळू नये, अशी तुमची इच्छा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा विरोध करण्याचे काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केले जात असल्याकडे श्री. बन यांनी लक्ष वेधले.

श्री. बन पुढे म्हणाले, जनतेने विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या पक्षाला तसेच संपूर्ण महाविकास आघाडीला चंदन लावले आहे. नारीशक्तीचा वंदन करण्याचे काम भाजपा आणि महायुतीने केले. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून सर्वसामान्य महिलांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचे काम कोणी केले असेल तर ते महाविकास आघाडी आणि काँग्रेसने केले. महिलाविरोधी वक्तव्य करायचे, महिलाविरोधी धोरण ठेवायचे काम राहुल गांधींनी केल्याने त्यांना एक नाही, दोन नाही तर तीन-तीन निवडणुकांमध्ये जनतेने चंदन लावले.

संजय राऊत, जर तुम्ही या विधेयकाला पाठिंबा दिला असता, महिला आरक्षण मंजूर केले असते तर आम्ही तुमचे अभिनंदन केले असते. या सगळ्या महिलांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले असते. परंतु महिलांच्या हातात सत्ता आली तर आपल्याला भ्रष्टाचार करता येणार नाही, पत्रा चाळीमध्ये घोटाळा करता येणार नाही. पुन्हा संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही म्हणून महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रकार संजय राऊत, उबाठा गट आणि महाविकास आघाडीने केल्याचा आरोप श्री. बन यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande