मर्सिडीझ बेंझने नवी लक्झरी कार ‘सीएलए बीईव्ही’ भारतात केली सादर
नवी दिल्ली, 28 एप्रिल, (हिं.स.)। जगातील आघाडीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीझ बेंझने भारतात आपली अत्याधुनिक ‘सीएलए बीईव्ही’ इलेक्ट्रिक सेदान सादर करत इलेक्ट्रिफिकेशनच्या धोरणाला नवी दिशा दिली आहे. सादरीकरणापूर्वीच या कारसाठी ४००हून अधिक ग्राहक
Mercedes Benz Launches New Luxury Car CLA BEV India


नवी दिल्ली, 28 एप्रिल, (हिं.स.)। जगातील आघाडीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीझ बेंझने भारतात आपली अत्याधुनिक ‘सीएलए बीईव्ही’ इलेक्ट्रिक सेदान सादर करत इलेक्ट्रिफिकेशनच्या धोरणाला नवी दिशा दिली आहे. सादरीकरणापूर्वीच या कारसाठी ४००हून अधिक ग्राहकांनी नोंदणी केल्याने भारतीय बाजारातील उत्स्फूर्त प्रतिसाद अधोरेखित झाला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष अय्यर यांच्या मते, ही आतापर्यंतची सर्वात स्मार्ट मर्सिडीझ असून ती पूर्णपणे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे.

ही कार ‘मर्सिडीज मॉड्युलर आर्किटेक्चर (MMA)’ आणि ८००-व्होल्ट आर्किटेक्चरवर आधारित असून ती भारतातील पहिली अशी गाडी आहे. ‘सीएलए बीईव्ही’ तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे—सीएलए २५०+ ‘लॉन्च एडिशन’, सीएलए २५०+ ‘लॉन्ग रेंज’ एएमजी लाईन आणि सीएलए २०० ‘स्टॅंडर्ड रेंज’. लॉन्ग रेंज मॉडेलमध्ये ७९२ किमीपर्यंत (WLTP) रेंज मिळते, तर २० मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमध्ये ४०० किमीपर्यंत रेंज मिळण्याची क्षमता आहे. सीएलए २०० मॉडेलमध्ये २० मिनिटांत ३२० किमी रेंज मिळते.

या कारमध्ये ‘एमबी.ओएस’ ऑपरेटिंग सिस्टीम आणि ‘एमबीयूएक्स’ची चौथी पिढी वापरण्यात आली आहे. ‘एनव्हिडिया’ चिप्समुळे प्रति सेकंद ५०८ ट्रिलियन ऑपरेशन्सची संगणन क्षमता मिळते. चॅटजीपीटी-४, एमएस बिंग आणि जेमिनी यांसह व्हर्च्युअल असिस्टंट, तसेच गूगल मॅप्सवर आधारित ‘इलेक्ट्रिक इंटेलिजन्स’ नेव्हिगेशन यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक बनतो.

सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘एडीएएस लेव्हल २’ प्रणाली देण्यात आली असून ओटीए अपडेट्सद्वारे ती लेव्हल २+ पर्यंत अपग्रेड करता येते. ‘एमबी.चार्ज पब्लिक’ नेटवर्कद्वारे देशभरातील ९,००० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध आहेत. कंपनीने भारतातील पहिला ‘हाय व्होल्टेज बॅटरी रिपोर्ट’ सादर करत पारदर्शकतेवर भर दिला आहे.

किंमतीच्या बाबतीत ‘सीएलए २००’ची सुरुवात ५५ लाख रुपयांपासून, ‘सीएलए २५०+ लॉन्ग रेंज’ ५९ लाख रुपये आणि ‘लॉन्च एडिशन’ ६४ लाख रुपयांपासून आहे. ८ वर्षे बॅटरी वॉरंटी, आकर्षक फायनान्सिंग योजना आणि ५९ टक्के बायबॅक हमी यामुळे ही कार भारतीय लक्झरी इलेक्ट्रिक वाहन बाजारात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande