
मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.)। भारताच्या शेअर बाजारासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठत नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या १३ कोटींच्या पुढे पोहोचली आहे. २७ एप्रिल २०२६ रोजीच्या व्यवहार सत्रात ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली गेली. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२५ मध्ये ही संख्या १२ कोटी होती, म्हणजेच अवघ्या सात महिन्यांत एक कोटी नव्या गुंतवणूकदारांनी एनएसईमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत लोकांचा वाढता कल स्पष्ट दिसतो.
एनएसईने दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांच्या रचनेतही मोठा बदल होत आहे. सध्या प्रत्येक चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे, ज्यामुळे महिलांचा आर्थिक निर्णय प्रक्रियेत वाढता सहभाग अधोरेखित होतो. त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे सरासरी वय घटून ३३ वर्षांवर आले आहे. २०२१ मध्ये हेच वय ३६ वर्षे होते. सुमारे ४० टक्के गुंतवणूकदार ३० वर्षांखालील असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत असल्याचे दिसून येते.
गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदार वाढीचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. एनएसईला पहिला एक कोटी गुंतवणूकदार मिळवण्यासाठी १४ वर्षे लागली होती. त्यानंतर पुढील ११ वर्षांत ही संख्या चार कोटींवर पोहोचली. मात्र अलीकडच्या काळात दर सहा ते आठ महिन्यांत एक कोटी नव्या गुंतवणूकदारांची भर पडत आहे, ही वाढीची गती अभूतपूर्व मानली जाते. वित्त वर्ष २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत एनएसईवरील गुंतवणूकदारांची संख्या २६.४ टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धीदराने वाढली आहे, जी त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या १५.२ टक्क्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. याच कालावधीत सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्यही १८ टक्के दराने वाढून ४६०.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
एनएसईचे जाळे देशभर विस्तारले असून सध्या भारतातील ९९.८५ टक्के पिनकोड क्षेत्रांत एनएसईचे गुंतवणूकदार आहेत. म्हणजेच देशातील जवळपास प्रत्येक जिल्हा आणि बहुतांश तालुक्यांपर्यंत शेअर बाजार पोहोचला आहे. राज्यनिहाय पाहता महाराष्ट्र सुमारे दोन कोटी गुंतवणूकदारांसह अव्वल स्थानावर आहे, तर उत्तर प्रदेश (१.५ कोटी) आणि गुजरात (१.१ कोटी) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule