
नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज दिवसभर तीव्र चढ-उतार पाहायला मिळाले आणि अखेरीस बाजार घसरणीसह बंद झाला. सकाळी बाजाराची सुरुवात कमकुवत झाली असली तरी सुरुवातीच्या सत्रात खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्सने ओपनिंग लेव्हलपासून सुमारे ४०० अंकांची उसळी घेतली, तर निफ्टीनेही १३० अंकांहून अधिक वाढ नोंदवली. मात्र सकाळी ११ वाजताच्या सुमारास विक्रीचा दबाव वाढू लागल्याने दोन्ही निर्देशांक पुन्हा घसरले आणि शेवटी सेन्सेक्स ०.५४ टक्के तर निफ्टी ०.४० टक्के घसरणीसह बंद झाले.
आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. याशिवाय कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील निर्देशांकही घसरणीत बंद झाले. याउलट ऊर्जा, ऑइल अँड गॅस आणि मेटल क्षेत्रात सातत्याने खरेदी दिसून आली. पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस, टेक आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रांनीही मजबुती दर्शवली. व्यापक बाजारात मात्र सकारात्मक वातावरण राहिले असून मिडकॅप निर्देशांक ०.२८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४२ टक्के वाढीसह बंद झाले.
आजच्या घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४६७.२६ लाख कोटी रुपयांवरून घटून ४६६.९४ लाख कोटी रुपयांवर आले, ज्यामुळे सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. व्यवहारादरम्यान एनएसईवर २,९६४ शेअर्समध्ये ट्रेडिंग झाले, त्यापैकी १,२४९ शेअर्स वाढीसह तर १,७१५ शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्स २०८.८४ अंकांनी घसरून ७७,०९४.७९ वर उघडला होता, त्यानंतर तो ७७,४९३.५३ पर्यंत पोहोचला; मात्र शेवटी ४१६.७२ अंकांनी घसरून ७६,८८६.९१ वर बंद झाला. निफ्टीने २४,०४९.९० वर सुरुवात करून २४,१८१.८० पर्यंत मजल मारली, पण अखेरीस ९७ अंकांनी घसरून २३,९९५.७० वर स्थिरावला. दिवसातील व्यवहारात ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नेस्ले हे टॉप गेनर्स ठरले, तर एक्सिस बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंटरग्लोब एव्हिएशन, मारुती सुझुकी आणि श्रीराम फायनान्स हे प्रमुख तोट्यातील शेअर्स ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule