महाराष्ट्रासाठी जनगणना 2027 साठी 1 ते 15 मे दरम्यान स्व-गणना पोर्टल केले सुरु
• स्व-गणना ऐच्छिक असून बंधनकारक नाही - मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे • महाराष्ट्रात 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक प्रत्येक घरी देणार भेट मुंबई, ३० एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनब
डॉ. निरुपमा डांगे


जनगणना


• स्व-गणना ऐच्छिक असून बंधनकारक नाही - मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे

• महाराष्ट्रात 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक प्रत्येक घरी देणार भेट

मुंबई, ३० एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईल, आणि सादर करता येईल.

देशात प्रथमच, 2027 च्या जनगणनेच्या माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल, ज्यामध्ये स्व-गणना हा देखील एक पर्याय असेल. महाराष्ट्र राज्यासाठी, घर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून तो 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत, महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली की, भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल.

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावर, एक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडी) तयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

स्व-गणना करणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. जर कोणी स्व-गणना केली नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही; माहिती गोळा करण्यासाठी/नोंदवण्यासाठी प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रत्येक घरी भेट देतील असे डांगे यांनी सांगितले.

स्व-गणना पर्यायांतर्गत व्यक्ती त्यांची माहिती स्वतःच ऑनलाईन स्वरुपात https://se.census.gov.in येथे भरु शकतील. स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक एसई आयडी येईल. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जेव्हा गणनाकार तुमच्या घरी भेट देतील, तेव्हा हा एसई आयडी त्यांच्यासोबत सामायिक करणे आवश्यक आहे. गणनाकाराकडून एसई डेटाची पडताळणी/मान्यता झाल्यानंतरच घर-यादी आणि गृहगणनेसाठीची गणना पूर्ण मानली जाईल.

'घर-यादी आणि गृहगणना' या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रगणक ज्यावेळी घरी भेट देतील त्यावेळी स्व-गणना डेटाची पडताळणी, पुष्टीकरण आणि तो अंतिमतः सादर करण्यासाठी एसई आयडी सामायिक करणे आवश्यक असेल. स्व-गणना पोर्टलद्वारे सादर केलेला सर्व डेटा एनक्रिप्ट केला जातो आणि कडक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांसह सुरक्षित सरकारी सर्व्हरमध्ये संग्रहित केला जातो. प्रत्येकाने योग्य यूआरएल, म्हणजेच https://se.census.gov.in, ला भेट देत असल्याची खात्री करावी आणि एसएमएस/ई-मेल संवादांची सत्यता पडताळून पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

स्वगणना करणाऱ्या नागरिकांनी हे सुनिश्चित करावे की ते https://se.census.gov.in या योग्य युआरएल ऍड्रेसलाच भेट देत आहेत तसेच ज्या एसएमएस /ई-मेल श्रेणीतून वन टाइम पासवर्ड (ओटीपी ) प्राप्त झाला आहे, त्याची सत्यता पडताळून पाहावी.

एसएमएस /ओटीपी द्वारे प्राप्त झालेल्या जनगणनेशी संबंधित सर्व संदेशांमध्ये प्रेषकाच्या नावात RGICEN हा कीवर्ड असतो, उदा. AD-RGICEN-S, BD-RGICEN-S, RGICEN-G, JK-RGICEN-G इत्यादी.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande