अमित शाह लडाखमध्ये अनेक दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधा आणि सहकारी उपक्रमांचे करणार उद्घाटन
नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.) - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह लडाख या केंद्रशासित प्रदेशात सहकारी तत्त्वांवर आधारित ग्रामीण विकासाला बळकटी देण्यासाठी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून 1 मे 202
अमित शाह लडाखमध्ये अनेक दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधा आणि सहकारी उपक्रमांचे करणार उद्घाटन


नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.) - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह लडाख या केंद्रशासित प्रदेशात सहकारी तत्त्वांवर आधारित ग्रामीण विकासाला बळकटी देण्यासाठी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून 1 मे 2026 रोजी लेह येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज (सीआयबीएस) येथे आयोजित एका कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह आणि लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात दुग्धप्रक्रिया क्षमता वाढवणे, शीत-साखळी प्रणाली सुधारणे आणि स्थानिक दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेशी संबंध विस्तारणे या उद्देशाने असलेल्या अनेक दुग्ध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाईल. सहकारी संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी तयार केलेल्या डिजिटल आणि संस्थात्मक उपक्रमांचाही या कार्यक्रमात प्रारंभ होईल.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह कारगिल येथे 10 टीएलपीडी क्षमतेच्या दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी करतील. तसेच लेह येथे दही व पनीर उत्पादनाच्या सुविधांचा समावेश असणाऱ्या नवीन दुग्ध प्रक्रिया युनिट्सचे उद्घाटन करतील. याव्यतिरिक्त, दूध साठवणूक आणि वाहतूक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने 'बल्क मिल्क कूलर' प्रणालीचाही शुभारंभ केला जाईल.

याचबरोबर सहकारी क्षेत्रातील डिजिटल सक्षमीकरणाच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी, खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत पारदर्शकता सुनिश्चित करण्याकरिता अँड्रॉइड-आधारित स्वयंचलित दूध संकलन प्रणाली (एएमसीएस) ॲप्लिकेशन सुरू केले जाईल.

गुणवत्ता हमी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच तळागाळातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने एका फिरत्या दूध तपासणी प्रयोगशाळेला, या कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवला जाईल. प्रमुख ब्रँड्सच्या दुग्धजन्य पदार्थांचे विपणन वाढवण्यासाठी प्रमुख भागधारकांमध्ये सामंजस्य करार होणार असून यामुळे स्थानिक उत्पादकांसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande