मध्य प्रदेशात पिकअप-स्कॉर्पिओच्या अपघातात १६ मजूर ठार, पंतप्रधानांकडून मदत जाहीर
भोपाळ, 30 एप्रिल (हिं.स.) - मध्य प्रदेशातील धार येथे बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण
अपघातग्रस्त वाहने


भोपाळ, 30 एप्रिल (हिं.स.) - मध्य प्रदेशातील धार येथे बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही अधिक गंभीर असल्याने त्यांना इंदूरला हलवण्यात आले आहे. चिकलिया फाटा येथे मजुरांनी भरलेली एक पिकअप अनियंत्रित होऊन उलटली आणि समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी दुःख व्यक्त केलं.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात जीवितहानी झाल्याचे समजताच अत्यंत दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे.

राज्य सरकारने देखील आर्थिक मदतीची घोषणा केली असून सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी इंदूरचे विभागीय आयुक्त आणि आयजींना जखमींच्या वैद्यकीय व्यवस्थेवर स्वतः लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तिरला पोलीस ठाणे हद्दीतील चिकलिया येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. एका पिकअप वाहनात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ४६ मजूर बसवले होते. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. अचानक पिकअप अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या वेगवान स्कॉर्पिओने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा चक्काचूर झाला आणि त्यातील मजूर रस्त्यावर इतरत्र फेकले गेले. मृत मजूर तिरला भागातील सेमलिया, नयापुरा, जलोखिया आणि सुलतानपूर येथील असल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी जिल्हाधिकारी अभिषेक चौधरी आणि डीआयजी मयंक अवस्थी यांनी पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. तिरला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ३५ जणांना रुग्णालयात आणले होते, त्यापैकी १२ जणांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती डॉ. छत्रपाल सिंह यांनी दिली आहे. मात्र नंतर मृतांचा आकडा 16 वर पोहोचला.

अंधारात मजुरांचा आक्रोश ऐकून जवळचे लोक आणि पेट्रोल पंप कर्मचारी मदतीसाठी धावून आले. २५ हून अधिक लोक अजूनही जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती डॉ. छत्रपाल सिंह यांनी व्यक्त केली आहे.

पिकअपमध्ये असलेल्या अनिता नावाच्या मजूर महिलेने सांगितलं की, गावात रोजगार नाही आणि मूलभूत सुविधाही नाहीत, त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्या गावात मजुरीसाठी जावं लागतं. त्या सकाळी कामासाठी घरातून निघाल्या होत्या आणि दिवसभर काम करून परतत असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी पिकअपचा वेग खूप जास्त होता आणि त्यात जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलेली होती.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप १० हून अधिक मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना इंदूरला पाठवण्यात आलं आहे. अचानक मोठ्या संख्येने रुग्ण आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande