
देहरादून , 05 एप्रिल (हिं.स.) उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.7 इतकी नोंदवण्यात आली असून त्याचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. धक्के जाणवल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले. मात्र कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची अद्याप पुष्टी झालेली नाही.
माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 वाजून 47 मिनिटे 8 सेकंदांनी बागेश्वर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, कुठूनही जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.7 इतकी मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र 30.047 अंश उत्तर अक्षांश आणि 79.901 अंश पूर्व रेखांश येथे स्थित होते. भूकंपाची खोली जमिनीखाली अंदाजे 10 किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शिखा सुयाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व तहसीलांकडून आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या हानीबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने जनजीवन सुरळीत सुरू आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode