मंत्रालयातील लाचखोरीवर एसीबीचा पुन्हा प्रहार; कक्ष अधिकारी विलास लाडला रंगेहात अटक
मुंबई, 05 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील मंत्रालयात सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकारांवर पुन्हा एकदा मोठी कारवाई करत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाला ला
mumbai acb raid mantralay officer caught bribe case


मुंबई, 05 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील मंत्रालयात सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकारांवर पुन्हा एकदा मोठी कारवाई करत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर लगेचच ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विलास लाड यांना खारघर परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी त्यांनी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक ट्रॅप लावला आणि लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही रक्कम इतकी मोठी आहे की, सर्वसामान्य नागरिकाचा वर्षभराचा पगारही यापेक्षा कमी असतो. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसाची कशी पिळवणूक होते, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. मंत्रालयासारख्या राज्य प्रशासनाच्या केंद्रबिंदू ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसत आहे.

विशेष म्हणजे, मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अखेरीमुळे एसीबीने मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या होत्या. त्या वेळी या कारवाया मार्च एन्डमुळे होत असल्याची चर्चा होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा एसीबीने मंत्रालयाकडे मोर्चा वळवून कारवाई केल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

खारघर येथे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात अशा प्रकारच्या कारवाया आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसीबीच्या या धडक मोहिमेमुळे लाचखोरीला आळा बसणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande