
नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.)। भारतात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. देशातील प्रमुख स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या अनेक मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली असून यामागे ग्लोबल मेमरी क्रायसिस हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जगभरात मेमरी स्टोरेजची कमतरता भासत असून त्याचा थेट परिणाम स्मार्टफोन उत्पादन खर्चावर झाला आहे आणि परिणामी कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत.
तज्ञांच्या मते, मेमरी चिपच्या किमती वाढल्याने हा फरक ६-८ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते, महागडे स्मार्टफोन डिजिटल इंडियासाठी आव्हान आहेत. बेसिक स्मार्टफोनची किंमत वापरकर्त्याच्या मासिक उत्पन्नाच्या ३०-४०% पर्यंत आहे. हे परवडण्याच्या निश्चित मानकापेक्षा (५%) अनेक पटींनी जास्त आहे. सिंधिया यांनी सुचवले आहे की, पीएलआय योजनेला 'मेक इन इंडिया'च्या पुढे नेऊन 'अफोर्डेबल इन इंडिया'च्या दिशेने घेऊन जावे.
रियलमी, शाओमी आणि वनप्लस या प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या विविध स्मार्टफोन मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली आहे. रॅम आणि स्टोरेज कंपोनेंट्सच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे उत्पादन खर्च वाढला असून याचा थेट परिणाम ग्राहकांवर पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे बजेट सेगमेंटमधील फोन देखील आता पूर्वीपेक्षा महाग झाले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.
रियलमी कंपनीने आपल्या अनेक मॉडेल्समध्ये किमतीत वाढ केली असून विशेषतः रियलमी 15 सिरीज आणि काही बजेट फोनचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उदाहरणार्थ, रियलमी पी४ लाईट 5G या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची लॉन्च प्राइस 12,999 रुपये होती, ती आता वाढून 13,499 रुपये झाली आहे. याचप्रमाणे रियलमी एस83 5G आणि रियलमी एस71 4G यांसारख्या मॉडेल्सच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. काही मॉडेल्समध्ये तर तब्बल हजारो रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
वनप्लस कंपनीनेही आपल्या प्रीमियम सेगमेंटमधील वनप्लस १५आर या स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या आहेत. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 47,999 रुपयांवरून 50,499 रुपयांपर्यंत वाढली आहे, तर 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 52,999 रुपयांवरून 55,499 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रीमियम स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनाही आता जास्त खर्च करावा लागणार आहे.
शाओमी कंपनीच्या रेडमी सिरीजमधील फोनदेखील या दरवाढीतून वाचलेले नाहीत. रेडमी 15C 5G, रेडमी 15 5G आणि रेडमी नोट 15 5G या मॉडेल्सच्या किमतीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. काही मॉडेल्समध्ये 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते, जे ग्राहकांसाठी मोठा आर्थिक भार ठरू शकतो.
5-10 हजार सेगमेंट: बाजारातील वाटा 24% आहे आणि यामध्ये 71% मॉडेल्स आता 5G तंत्रज्ञानाचे आहेत. तर 15 हजार पेक्षा कमी सेगमेंट: याचा एकूण बाजारातील वाटा 4% राहिला आहे आणि यामध्ये 100% मॉडेल्स 4G आहेत. फीचर फोनपेक्षा 7 पट महाग स्मार्टफोन झाले आहेत.
या वाढीव किमती कंपन्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट केल्या असून बाजारातही त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक ब्रँड्सने देखील त्यांच्या स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात स्मार्टफोन खरेदी करणे अधिक महाग होण्याची शक्यता आहे.
तथापि, ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बाब म्हणजे सणासुदीच्या सेलच्या काळात कंपन्या काही बँक डिस्काउंट किंवा विशेष ऑफर्स देतात. अशा ऑफर्समुळे काही प्रमाणात किंमत कमी होऊ शकते, मात्र त्यासाठी ग्राहकांना योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. एकंदरीत, ग्लोबल मेमरी क्रायसिसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून स्मार्टफोन खरेदी करताना आता ग्राहकांना अधिक खर्चाचा विचार करावा लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule