
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा भारतीच्या महोत्सवाला सुरवात झाली. तलवारबाजी, कबड्डी, कराटे, जिम्नॅस्टिकसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
चिकलठाणा येथे तलवारबाजी स्पर्धेद्वारे महोत्सवाच्या मुख्य उद्घाटनाचा सोहळा झाला. यावेळी अध्यक्ष पंकज भारसाखळे, विभाग अध्यक्ष नवीन बगडिया, उपाध्यक्ष डी.आर. खैरनार पाटील, विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष दिनेश वंजारे, डॉ. प्रताप कलावंत आणि आशिष कान्हेड यांची उपस्थिती होती. तलवारबाजी स्पर्धेत १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सिल्लोड जिल्ह्यातील आडगाव बु. येथील मल्हारराव होळकर प्राथमिक आश्रमशाळेत कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यात मुलांच्या गटात देवगिरी वॉरिअर्स संघ विजेता, तर सूर्यपुत्र इलेव्हन उपविजेता ठरला.
मुलींच्या गटात अहिल्या इलेव्हन विजेता, तर जिजाऊ टायगर संघ उपविजेता ठरला. सर्व खेळाडूंना टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. तर समर्थनगर येथील शिवराम जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धा घेण्यात आल्या. ज्यामध्ये ६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच हिमायत बाग येथील एमपीपी स्पोर्टस पार्क येथे कराटे स्पर्धांमध्ये ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध गटांतील विजेत्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके पटकावली. या उपक्रमाचे नियोजन महेंद्र रंगारी यांनी केले. वैजापूर जिल्ह्यात वेरूळ येथील समंतभद्र विद्या मंदिर येथे खो-खो स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत मुलांचे ६ व मुलींचे ४ संघ सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis