
जळगाव, 07 एप्रिल (हिं.स.) युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर होत असताना त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दरात सातत्याने चढ-उतार सुरू असून काल सोमवारी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. आज जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी बाजारातील अनिश्चितता कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्याच्या दरानुसार, जळगावमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचे भाव १ लाख ४८ हजार रुपये प्रति तोळा इतके झाले आहेत, तर चांदीचे भाव २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ५२ हजार ४४० रुपये, तर चांदीचा दर २ लाख ४२ हजार ५०० रुपये इतका असल्याची माहिती सुवर्णनगरीतील सराफ व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष आता बाजारातील घडामोडींवर लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर