पालीत मंदिराबाहेर वाद; व्यक्तीवर मारहाण, डोक्याला दुखापत
रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। पाली पोलीस ठाणे हद्दीत बल्लाळेश्वर मंदिर परिसरात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास
Argument-outside-temple-in-Pal


रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। पाली पोलीस ठाणे हद्दीत बल्लाळेश्वर मंदिर परिसरात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे श्री बल्लाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येत असताना अशोक मिनाले यांच्या पेढ्याच्या दुकानासमोर आले. यावेळी त्यांनी आरोपीच्या कुत्र्याला हुसकावून लावले. या कारणावरून आरोपी संतापला आणि त्याने फिर्यादीच्या कानाखाली थप्पड मारली.

यानंतर आरोपीने फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावून त्याच काठीने त्यांच्या कंबरेवर मारहाण केली, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने निष्काळजीपणे फिर्यादीला जोरात धक्का दिला. त्यामुळे फिर्यादी मंदिराच्या पायऱ्यांजवळील पेढ्यांच्या दुकानाच्या लोखंडी कडीवर आपटले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), १२५(अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी म्हात्रे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande