
अकोला, 08 एप्रिल (हिं.स.) : अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले असून, हा अपघात नसून खून असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.सुरुवातीला हा प्रकार घातपात की अपघात याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सखोल तपासानंतर पोलिसांनी धक्कादायक वास्तव समोर आणले. संबंधित महिलेचा खून तिच्याच पतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा पती यांच्यात वारंवार कौटुंबिक वाद होत होते. या वादातूनच संतापाच्या भरात पतीने महिलेचा गळा चिरून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह निर्जनस्थळी नेऊन टाकला आणि ओळख पटू नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी पती सादिक शहा तसरीफ शहा याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येत असून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मृत महिला यांचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक लहान मूल असून, कौटुंबिक वादातूनच हे हत्याकांड घडल्याचे तपासात उघड झाले आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे