
जळगाव, 08 एप्रिल (हिं.स.) भुसावळ शहरातील इराणी मोहल्ला परिसरात लपवून ठेवलेल्या २ लाख १० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तीन दुचाकी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने जप्त केल्या. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवि नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक इराणी मोहल्ला, रजा टॉवर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका घराच्या आडोशाला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली आढळून आल्या. संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेतला तेव्हा कोणीही समोर आले नाही. त्यानंतर पोलिसांनी तीनही दुचाकी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास केला.
तपासादरम्यान या तिन्ही मोटारसायकली अनुक्रमे मुक्ताईनगर, चोपडा शहर व तोफखाना (अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये पल्सर (एम. एच. १९, ई.एस. ३५५५), पल्सर एन-१६० (एम.एच.१९, ई.टी.३३८०) तसेच केटीएम ड्यूक २५० (एम.एच.१६, डी.टी. ७४३३) या दुचाकींचा समावेश आहे. या प्रकरणी हसन अली उर्फ आशु नियाजअली इराणी (रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) याला अटक करण्यात आली असून सलमान अली हुजूरअली इराणी हा आरोपी फरार आहे. दोघांनी मिळून या दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर