
जळगाव, 08 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यातील धरणगावात एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राहुल जगन्नाथ अहिरे असं या संशयित आरोपीचं नाव असून त्याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या नराधम शिक्षकाला पीडितेच्या संतप्त कुटुंबीयांनी चांगलाच चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी जेव्हा इयत्ता नववीत होती, तेव्हा संशयित आरोपी शिक्षक राहुल अहिरे याने तिच्याशी गोड बोलून जवळीक साधली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढून घेतले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तो गेल्या तीन वर्षांपासून म्हणजेच २०२२ पासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंत वारंवार तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी करून तिचे लैंगिक शोषण करत होता. पीडित मुलगी शाळा सोडून महाविद्यालयात गेल्यानंतरही या वासनांध शिक्षकाचा छळ थांबला नाही. फोटोची भीती दाखवून तो तिला वारंवार धमकावत होता. या सततच्या छळाला आणि मानसिक तणावाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर धाडस करून आपल्या कुटुंबीयांना ही आपबिती सांगितली. हे ऐकून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि विद्यार्थिनीने धरणगावमध्ये या शिक्षकाला गाठले आणि काठ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात राहुल अहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर