
घोष पथकाच्या ‘राष्ट्र स्वराधना’ हस्तलिखित इतिहासाचे लोकार्पण
नागपूर, 08 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. अविरत संघकार्याला 100 वर्षे पूर्ण झाली म्हणून आम्ही केवळ सेलिब्रेशन करत नाही, तर हा सिंहावलोकनाचे आणि पूर्वजांचे स्मरण करून अधिक उन्नत अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आज, बुधवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगरातील घोष पथकाच्या इतिहासावरील ‘राष्ट्र स्वराधना’ या हस्तलिखिताच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, संघाचे कार्य कुणाच्या कृपेने पुढे आले नाही, तसेच कुणाच्या अवकृपेने ते अडखळलेही नाही. स्वयंसेवकांच्या परिश्रमातूनच हे कार्य साकारले गेले आहे. गेल्या 100 वर्षांचा इतिहास अतिशय प्रेरक आणि रोचक आहे. ‘सिंहासन बत्तीसी’च्या कथेत ज्या प्रकारे एक-एक मूर्ती पुढे येऊन राजाला बोधकथा सांगते आणि त्यानंतर राजा विक्रमादित्य आत्मचिंतन करून त्या सिंहासनावर यापूर्वी बसलेल्या पूर्वसुरींशी स्वतःची तुलना करतो, अगदी तशीच जबाबदारी वर्तमानातील सर्व स्वयंसेवकांवर आहे. आमच्या पूर्वजांनी केलेले कार्य आम्हाला केवळ अबाधित ठेवायचे नाही, तर ते अधिक उन्नत पद्धतीने पुढे न्यायचे आहे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
संघाचे सर्व कार्यक्रम संस्कार रुजवण्यासाठीच असतात. सुदृढ शरीर आणि संस्कारी मन यांची सांगड घालून गुणवत्तेकडे वाटचाल करणे हे आमचे ध्येय आहे. त्या दृष्टीने ‘राष्ट्र स्वराधना’ हा नागपूरमधील घोष पथकाचा हस्तलिखित इतिहास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपले नाव स्वर्णाक्षरांत अंकित करण्याचा संघाचा हेतू नाही, कारण या शतकी प्रवासाचे श्रेय जनता, समाज आणि देशाचे आहे. संघाच्या घोष पथकात विविध वाद्यांचा समावेश असतो. प्रत्येक वाद्याचा नाद आणि स्वर भिन्न असला तरी ही सर्व वाद्ये एकाच तालावर चालतात. यातून समन्वयाची भावना वाढीस लागण्यास मदत मिळते, असे सरसंघचालकांनी सांगितले.
‘सत्यम-शिवम-सुंदरम’ हे भारतीय कलेचे तत्त्वज्ञान आहे. घोष पथकाच्या स्वरधुनी असोत किंवा इतर कोणतेही कार्य असो, ते मनापासून आणि अंतःकरणपूर्वक केल्यास त्याची फलश्रुती ‘सत्यम-शिवम-सुंदरम’ अशीच होते. समाजात आणि देशात ‘सत्यम-शिवम-सुंदरम’ निर्माण करणे हाच संघाचा हेतू आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी अधिक संघटित आणि व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी