
रायगड, 08 एप्रिल (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत खिरकीडी येथील एएमएनएस कंपनीतील स्क्रॅप मालाच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एएमएनएस कंपनी, खिरकीडी येथील स्क्रॅप मालाच्या वाहतुकीसाठी दुर्गा ट्रान्सपोर्टरचे संजित रॉय यांना भाडे दिले होते. त्यानुसार, दुर्गा ट्रान्सपोर्टरने दोन ट्रक (क्र. जीजे-१२ बीव्ही ९६७९ आणि जीजे-१२ बीएक्स ५१९९) स्क्रॅप वाहतुकीसाठी पाठविले होते. संबंधित दोन्ही चालकांनी कंपनीतून स्क्रॅप माल भरून घेतला.
यामध्ये पहिल्या ट्रकमध्ये सुमारे २६,९०० किलो वजनाचा अंदाजे १०,१७,९०० रुपये किंमतीचा माल, तर दुसऱ्या ट्रकमध्ये १,४१० किलो वजनाचा सुमारे ५४,९९० रुपये किंमतीचा माल असा एकूण २८,३१० किलो वजनाचा आणि अंदाजे १०,७२,९०० रुपये किमतीचा स्क्रॅप माल होता. मात्र, आरोपी चालकांनी हा माल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता, फिर्यादी व कंपनीच्या संमतीशिवाय परस्पर अन्यत्र उतरवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(३) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बहाडकर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)