रत्नागिरीच्या समुद्रात आणखी एका अनधिकृत मच्छीमारी नौकेवर कारवाई
रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरीच्या समुद्रात आणखी एका अनधिकृत मच्छीमारी नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. जयगड बंदर परिसरात मध्यरात्री मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. समुद्रातील उग्र लाटा आणि अंधाराचा फायदा
अनधिकृत मासेमारी करणारी जप्त करण्यात आलेली नौका


रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरीच्या समुद्रात आणखी एका अनधिकृत मच्छीमारी नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे.

जयगड बंदर परिसरात मध्यरात्री मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. समुद्रातील उग्र लाटा आणि अंधाराचा फायदा घेत एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या ३ नौकांना विभागाने रंगेहाथ पकडले. गेल्या ३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २:१७ वाजता मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान गस्त घालत असताना “भराडी प्रसन्न” (IND-MH-04-MM-3723) ही नौका एलईडी साधनांसह रंगेहाथ जप्त करण्यात आली. त्यानंतर ७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गुहागर-दाभोळ परिसरात पुन्हा एकदा 'डबल स्ट्राइक' करण्यात आला. यावेळी “सफा मरवा-१” (IND-MH-4-MM-4041) ही नौका अवैध मासेमारी करताना सापडली. ही नौका सध्या दाभोळ बंदरात जप्त करून ठेवण्यात आली आहे.

या यशस्वी मोहिमेत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सौ. दीप्ती साळवी (दाभोळ) आणि स्वप्नील चव्हाण (गुहागर) यांनी नेतृत्व केले. त्यांना सागरी सुरक्षा पर्यवेक्षक प्रशांत येलवे, विनायक शिंदे, सुरक्षा रक्षक राजन शिंदे, योगेश तोस्कर व प्रतीक शिर्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जप्त करण्यात आलेल्या सर्व नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अध्यादेश २०२१ अंतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सर्व प्रकरणे आता रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांकडे न्यायनिर्णयासाठी सादर केली जाणार आहेत. यापुढील काळातही ही मोहीम अशीच तीव्र राहणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.

अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन क्लीन-सी’ अंतर्गत मोठी मोहीम उघडली आहे. जयगडपासून दाभोळपर्यंतच्या विस्तीर्ण समुद्रकिनारी भागात विभागाने शोधमोहीम सुरू केली असून गेल्या काही दिवसांत सलग कारवाया करत अवैध एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांवर थेट धाड घातली आहे. या कारवाईमुळे मत्स्य संपत्तीची लूट करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande