भारत-नेदरलँडने द्विपक्षीय संबंधांना दिले धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप
आम्स्टरडॅम (द हेग ), 17 मे (हिं.स.)। भारत आणि नेदरलँड यांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांना ‘धोरणात्मक भागीदारी’ म्हणून उन्नत केले आहे. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द हेग येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर ‘धो
Netherlands PM Rob Jetten and Indian PM Narendra Modi


आम्स्टरडॅम (द हेग ), 17 मे (हिं.स.)। भारत आणि नेदरलँड यांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांना ‘धोरणात्मक भागीदारी’ म्हणून उन्नत केले आहे. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द हेग येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर ‘धोरणात्मक भागीदारी रोडमॅप (२०२६-२०३०)’ वर शिक्कामोर्तब करण्यात आले. व्यापार, तंत्रज्ञान आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करणे हा या कराराचा उद्देश आहे. या ऐतिहासिक संयुक्त निवेदनात अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.

आवागमन आणि स्थलांतर करार

भारत आणि नेदरलँड यांच्यात व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या सुलभ प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण स्थलांतर करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सेमिकंडक्टर आणि तंत्रज्ञान

धोलेरा येथे सेमिकंडक्टर फॅबच्या विकासासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एएसएमएल यांच्यात भागीदारी करण्यात आली. यासोबतच महत्त्वपूर्ण खनिजांच्या देवाणघेवाणीसाठी खाण मंत्रालयानेही करार केला आहे.

हरित हायड्रोजन आणि ऊर्जा

भारत आणि नेदरलँड यांनी ‘हरित हायड्रोजन विकासासाठी भारत-नेदरलँड रोडमॅप’ सुरू केला. यामुळे अक्षय ऊर्जा संक्रमणातील सहकार्याला गती मिळणार आहे.

सांस्कृतिक देवाणघेवाण आणि कला

नेदरलँडने चोल राजवंशातील ऐतिहासिक ताम्रपट भारताला परत सुपूर्द केले. तसेच सागरी वारसा संवर्धनासाठी लोथल (गुजरात) येथील नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्सशी संबंधित करारही करण्यात आला.

या दौऱ्याचे महत्त्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेदरलँड दौरा भारतासाठी अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, नेदरलँड हा भारतातील अव्वल पाच गुंतवणूकदार देशांपैकी एक आहे आणि गेल्या दहा वर्षांत दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले आहेत.

संबंधांना मिळाली नवी दिशा

भारत आणि युरोपियन संघ यांच्यातील व्यापार कराराच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीमुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक बळकट होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. भारत आणि नेदरलँड मिळून नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण करू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

१७ मोठे करार

पंतप्रधान मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये १७ मोठे करार झाले. हे करार केवळ व्यापारापुरते मर्यादित नसून तंत्रज्ञान, शिक्षण, ऊर्जा, शेती, आरोग्य, दुग्धव्यवसाय, जलव्यवस्थापन आणि सांस्कृतिक वारसा अशा क्षेत्रांतही मोठे बदल घडवून आणतील. या निर्णयांमुळे विकास, रोजगार, गुंतवणूक आणि जागतिक सहकार्याला नवी दिशा मिळेल, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे. यामुळे भारताला नवीन तंत्रज्ञान, रोजगार आणि जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोच मिळेल. संरक्षण, सायबर सुरक्षा आणि पुरवठा साखळीवरही दोन्ही देश एकत्रितपणे काम करणार आहेत.

व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती

भारत आणि नेदरलँड यांच्यात व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर सहमती झाली. यामुळे भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगारांना शिक्षण व रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील. इंटर्नशिप आणि दीर्घकालीन व्हिसामध्येही सवलती मिळतील.

उच्च शिक्षणात सहकार्य

नालंदा विद्यापीठ आणि ग्रोनिंगेन विद्यापीठ यांच्यातही भागीदारी करण्यात आली आहे. दोन्ही देशांतील विद्यापीठे आता संयुक्त संशोधन आणि पदवी कार्यक्रम राबवू शकतील. भारतीय विद्यार्थी आणि शिक्षकांना डच विद्यापीठांमध्ये शिक्षण व संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

भारताची औद्योगिक ताकद वाढणार

महत्त्वपूर्ण खनिजांवरील सहकार्य करारामुळे इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि उच्च तंत्रज्ञान उद्योगांसाठी आवश्यक खनिजांचा पुरवठा अधिक मजबूत होईल. यामुळे भारताची औद्योगिक क्षमता वाढेल. तसेच भारत आणि नेदरलँड हरित हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीमध्ये संयुक्तपणे काम करणार आहेत. यामुळे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार वाढतील. भारताला युरोपच्या हरित ऊर्जा बाजारपेठेत मजबूत स्थान मिळू शकेल. दोन्ही देश सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्यांची देवाणघेवाण करतील.

नीती आयोग आणि नेदरलँड

भारताच्या नीती आयोगाच्या सहकार्याने ऊर्जा सुरक्षा, हरित ऊर्जा आणि नव्या तंत्रज्ञानावर संयुक्त प्रकल्प राबवले जाणार आहेत. यामुळे गुंतवणूक आणि उद्योगांना फायदा होईल. नेदरलँड गुजरातमधील मोठ्या जलप्रकल्पासाठी तांत्रिक मदत करणार आहे. यामुळे पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योगांसाठी पाण्याची उपलब्धता वाढू शकते.

त्रिपुरातील फुलांचा सुगंध जगभर दरवळणार

फ्लॉवर सेंटर ऑफ एक्सलन्स, त्रिपुरा यासाठी नेदरलँडकडून सहकार्य दिले जाणार आहे. यामुळे फुलशेतीला आधुनिक तंत्रज्ञान मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि निर्यातीला चालना मिळण्यास मदत होईल. बंगळुरूमधील इंडो-डच डेअरी सेंटरलाही मदत करण्याचे आश्वासन नेदरलँडने दिले आहे. यामुळे दुग्धव्यवसायिक शेतकरी आणि पशुपालन क्षेत्राला नवे तंत्रज्ञान व प्रशिक्षण मिळेल. दूध उत्पादन आणि गुणवत्ता सुधारेल. तसेच भारतीय पशुपालन क्षेत्राला अधिक चांगली आरोग्य व्यवस्था, रोग नियंत्रण आणि कौशल्य प्रशिक्षणाचाही लाभ मिळेल.

आरोग्य क्षेत्रातील सहकार्य

दोन्ही देश आरोग्य क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. संयुक्त निवेदनात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय संशोधन आणि वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीवर भर देण्यात आला आहे. भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी हे सहकार्य उपयुक्त ठरणार आहे.

सर्वात महत्त्वाचा करार

व्यापार आणि आयात-निर्यात प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल. गुंतवणूक, हरित विकास, अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत दीर्घकालीन भागीदारी वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

दहशतवादाविरोधात ठाम भूमिका

भारत आणि नेदरलँड दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावर ठाम आणि समान भूमिका घेतात. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला समर्थन न देणे, त्याच्या वित्तपुरवठ्यावर आळा घालणे आणि दहशतवादाविरोधातील कारवाईत कोणतेही “दुहेरी निकष” वापरण्याचा दोन्ही देशांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच सर्व देशांनी दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान नष्ट करावे आणि दहशतवादी नेटवर्क तसेच त्यांच्या आर्थिक पुरवठा साखळीला खिळ घालावी, असे आवाहन भारत आणि नेदरलँड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande