मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीए अभ्यासक्रमात ‘भूमिका’ नाटकाचा समावेश
मुंबई, 18 मे (हिं.स.)। समकालीन भारतीय रंगभूमीवर विशेष चर्चेत असलेले आणि प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही मोठी दाद मिळवलेले ‘भूमिका’ हे क्षितिज पटवर्धन लिखित नाटक आता अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. व्
Bhumika Play Included in University of Mumbai  TY BA Curriculum


मुंबई, 18 मे (हिं.स.)। समकालीन भारतीय रंगभूमीवर विशेष चर्चेत असलेले आणि प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही मोठी दाद मिळवलेले ‘भूमिका’ हे क्षितिज पटवर्धन लिखित नाटक आता अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा उत्कृष्ट समतोल साधणारे हे नाटक आता खऱ्या अर्थाने आधुनिक मराठी रंगभूमीवरील ‘क्लासिक’ ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विविध प्रकारच्या अस्मिता, संघर्ष आणि समकालीन सामाजिक अराजकाच्या पार्श्वभूमीवर मानवता, विवेक आणि प्रामाणिकपणाची मूल्ये ठामपणे अधोरेखित करणाऱ्या या नाटकात प्रबोधनाची मोठी ताकद असल्याने मराठी अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

अष्टपैलू अभिनेते सचिन खेडेकर यांनी तब्बल २१ वर्षांनंतर ‘भूमिका’च्या माध्यमातून रंगभूमीवर दमदार पुनरागमन केले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाटकात कलाकाराच्या आयुष्यातील मानसिक गुंतागुंत, अभिनय आणि वास्तव यामधील धूसर होत जाणारी सीमारेषा अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. नाटकातील आशय, सादरीकरण आणि कलात्मक मांडणीमुळे ‘भूमिका’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे.

या नाटकाला नुकताच मानाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर सन्मान’ प्राप्त झाला असून विविध विभागांमध्ये आतापर्यंत तब्बल १५ प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच प्रकाश आंबेडकर, जावेद अख्तर, परेश रावल, विकास दिव्यकीर्ती, आयपीएस पानोज कुमार शर्मा, आशुतोष गोवारीकर, कुमार केतकर आणि फिरोज अब्बास खान यांसारख्या विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी या नाटकाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

अवघ्या एका वर्षात ‘भूमिका’ने १२५ प्रयोग पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाचा गौरव म्हणून मुंबईतील प्रतिष्ठित ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात’ या नाटकाच्या विशेष प्रयोगासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

‘भूमिका’मध्ये समिधा गुरु, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर आणि सचिन खेडेकर यांसारख्या दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळते. आशयघन आणि विचारांना अस्वस्थ करणारे हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करायला भाग पाडते. अभिनय, पात्रयोजना, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांचा अप्रतिम संगम या नाटकात अनुभवायला मिळतो. नाटक संपल्यानंतरही त्यातील प्रश्न आणि विचार प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात आणि कदाचित हीच ‘भूमिका’ची सर्वात मोठी ताकद ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande