पुण्यात २५ मेपासून ‘श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवा’ची रंगत
पुणे, 20 मे (हिं.स.)पुणेस्थित महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने २५ ते ३१ मे या कालावधीत श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे येथे ‘श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीत विविध विचारप्रवाह, नाविन्यपू
पुण्यात २५ मेपासून ‘श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवा’ची रंगत


पुणे, 20 मे (हिं.स.)पुणेस्थित महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने २५ ते ३१ मे या कालावधीत श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे येथे ‘श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीत विविध विचारप्रवाह, नाविन्यपूर्ण कथाकथन शैली आणि समकालीन प्रायोगिक रंगभूमीचे दर्शन घडविणाऱ्या निवडक नाटकांचा समावेश असणार असल्याची माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.

सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि नवी दिल्लीसह देशातील विविध भागांतील नऊ वेगवेगळ्या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. ही नाटके प्रामुख्याने हिंदी, इंग्रजी आणि ‘जिबरिश’ (सांकेतिक / अस्पष्ट) भाषेत सादर केली जाणार असून, प्रादेशिक भाषेचा काही अंश असला तरी ती प्रेक्षकांना सहज समजतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.पुणे शहरात संगीत, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोठे महोत्सव होत असले तरी प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठाची उणीव जाणवत होती. ‘श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवा’च्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.

महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी ज्येष्ठ अभिनेते परेश रावल आणि नसीरुद्दीन शाह यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. हा महोत्सव देशातील प्रायोगिक रंगभूमीतील नव्या प्रवाहांची ओळख करून देणारा ठरेल, तसेच रंगकर्मी आणि रसिकांना नव्या कलात्मक प्रयोगांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.महोत्सवादरम्यान ‘भारतीय रंगभूमीतील प्रयोगशीलतेचा प्रवास’ आणि ‘इ.स. २००० नंतर मराठी रंगभूमीतील संहितांमध्ये झालेले बदल’ या विषयांवर दोन विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. या परिसंवादांमध्ये अभिलाष पिल्लई, के. तोम्बा, अनुरूपा रॉय, युकी एलियास, केदार शिंदे आणि अभिराम भडकमकर यांसारख्या मान्यवरांचा सहभाग असणार आहे. तसेच रंगभूमी क्षेत्रातील दिग्गजांकडून ‘मास्टर क्लास’ सत्रांचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वनारसे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande