
अशोक सराफ-निवेदिता सराफांसह मराठी कलाकारांनी जिंकली जगाची मनं
मुंबई, 18 मे (हिं.स.)। सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हल सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटांचा गौरव केला जात असतानाच रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे ग्लॅमरस लूक आणि त्यांची स्टाईलही प्रचंड चर्चेत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातील अनेक कलाकारांनी आपल्या खास व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली. मात्र, यंदाचा कान्स मराठी रसिकांसाठी विशेष ठरला आहे. कारण यंदा मराठी कलाकारांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मराठी प्रेक्षकांचे लाडके अशोकमामा यांनी निवेदिता सराफ यांचा हात हातात धरत अत्यंत दिमाखात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. त्यांच्या या आगमनाने उपस्थितांच्या नजरा अक्षरशः त्यांच्यावर खिळल्या. त्यामागचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यांनी साकारलेला पारंपरिक मराठमोळा साज.
कान्ससाठी अशोक सराफ यांनी पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट असा साधा पण आकर्षक पेहराव केला होता. तर निवेदिता सराफ महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पैठणी साडीत अवतरल्या होत्या. त्यांनी केसांमध्ये गजरा माळत पारंपरिक दागिन्यांनी आपला साज अधिक खुलवला होता. रेड कार्पेटवर त्यांचा हा मराठमोळा लूक पाहून अनेक जण भारावून गेले. विशेष म्हणजे रेड कार्पेटवर येताच अशोक सराफ यांनी हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्यांच्या या संस्कारपूर्ण कृतीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्या लूकवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “महाराष्ट्राच्या मातीतला मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो आपले संस्कार आणि संस्कृती विसरत नाही.” ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यंदाच्या कान्समध्ये केवळ अशोक आणि निवेदिता सराफ यांनीच नव्हे, तर मराठी मनोरंजनविश्वातील इतर कलाकारांनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पारंपरिक मराठी पेहरावात रेड कार्पेटवर हजेरी लावत मराठी संस्कृतीची सुंदर झलक जगासमोर सादर केली. तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर हिनेही पारंपरिक मराठमोळ्या साजात उपस्थित राहत चाहत्यांची मनं जिंकली.
काही दिवसांपूर्वी अभिनेता पुष्कर जोग यानेदेखील कान्समधील त्याच्या स्टायलिश लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता मराठी कलाकारांची वाढती उपस्थिती पाहता यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल हा खऱ्या अर्थाने “माय मराठीचा डंका” जगभरात वाजवणारा ठरत असल्याची भावना मराठी प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
मराठी कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पारंपरिक संस्कृतीचा अभिमानाने केलेला सन्मान पाहून मराठी रसिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. ग्लॅमर आणि आधुनिकतेच्या या भव्य मंचावर मराठमोळेपणाची छाप उमटवत मराठी कलाकारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान उंचावला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule