
अमरावती, 02 मे (हिं.स.) : अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अन्सार शेख सत्तार (वय ५२), शुभम भाऊराव उताणे (वय २९), कृष्णा शंकरराव रायकवार (वय २०) आणि सचिन भाऊराव उताणे (वय ३६) यांचा समावेश असून, सर्वजण अमरावती परिसरातील रहिवासी आहेत.
या प्रकरणी सहाय्यक अभियंता सुदाम गजानन पाकधाणे यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, माहुली ते कोठोडा रस्ता तसेच धारफळ शेतशिवार परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत खांब पाडून सुमारे ३८०० मीटर अॅल्युमिनियम तार चोरी केली होती. या तारांची अंदाजे किंमत ७२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शुभम उताणे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी रात्रीच्या वेळी टवेरा वाहनातून जाऊन दोरीच्या साहाय्याने सिमेंट खांब पाडून तार चोरी करत असल्याचे तपासात उघड झाले.
चोरीचा माल अमरावतीतील एका व्यापाऱ्याला विक्री केल्याचेही समोर आले आहे. या टोळीने लोणी, मंगरुळ चव्हाळा आणि बडनेरा परिसरात अशाच प्रकारचे एकूण चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल तसेच अन्य साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी