
अमरावती, 02 मे (हिं.स.)। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत अवैध देशी-विदेशी दारू साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २ लाख ४ हजार ८१० रुपयांचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला असून अशोक महावीर पटेल (वय ६०, रा. विलासनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ मे रोजी सकाळी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विलासनगर परिसरात छापा टाकला. आरोपीच्या घरातून विविध कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. यात रॉयल स्टॅग, ऑफिसर्स चॉइस, इम्पीरियल ब्लू, मॅकडॉवेल्स, ट्युबॉर्ग, किंगफिशर आदी ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५(ई), ६६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाने केली. पुढील तपास पोउपनि सागर ठाकरे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी