




रोम, २० मे (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री त्यांच्या सहा दिवसांच्या, पाच देशांच्या परदेश दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी इटलीची राजधानी रोममध्ये दाखल झाले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या सन्मानार्थ रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते, ज्या दरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्यावर अनौपचारिक आणि सखोल चर्चा केली.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे इटलीत आगमन झाल्यावर विशेष पद्धतीने स्वागत केले. त्यांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, रोममध्ये आपले स्वागत आहे, माझ्या मित्रा.
पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, रोममध्ये दाखल झाल्यावर त्यांना पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबत रात्रीच्या जेवणासाठी भेटण्याची आणि कोलोसियमला भेट देण्याची संधी मिळाली. अनेक विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली आणि भारत-इटली मैत्री अधिक दृढ करण्यावर आजच्या चर्चेत विचारविनिमय सुरू राहील.
यानंतर, पंतप्रधान मोदींनी इटलीतील भारतीय समुदायाचीही भेट घेतली. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ही माहिती देताना त्यांनी लिहिले, रोममधील भारतीय समुदायाकडून मला मिळालेल्या हार्दिक स्वागताबद्दल मी मनापासून आभारी आहे. भारताप्रती असलेले त्यांचे नितांत प्रेम आणि भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्याची त्यांची वचनबद्धता प्रशंसनीय आहे. परदेशस्थ भारतीय समुदाय जगभरात आपल्या देशाला अभिमान वाटायला लावतो.
पंतप्रधान मोदी यांनी प्रसिद्ध इटालियन चित्रकार जियाम्पाओलो टोमासेटी यांचीही भेट घेतली आणि काशीवर आधारित त्यांची चित्रे पाहिली. पंतप्रधानांनी
एक्सवर लिहिले, रोममधील काशीची एक झलक. टोमासेटी यांची भारतीय संस्कृतीबद्दलची आवड चार दशकांपूर्वीची आहे. त्यांनी १९८० च्या दशकात वैदिक संस्कृतीवरील पुस्तकांना चित्रे काढली आणि २००८ ते २०१३ दरम्यान महाभारतावर आधारित २३ मोठी चित्रे तयार केली.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, पंतप्रधानांनी माहिती दिली की, रोममध्ये भारतीय नृत्याची आवड असणाऱ्या पाच इटालियन कलाकारांनी: स्वामिनी आत्मानंद गिरी, मार्टिना मीनाक्षी अर्गाडा, लुक्रेशिया मॅनिस्कॉटी, व्हॅलेरिया वेस्पाझियानी आणि रॉसेला फॅनेली यांनी 'त्रिगळबंदी' हा कार्यक्रम सादर केला, ज्यामध्ये कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथक यांचा समावेश होता. त्यांनी लिहिले की, भारतीय नृत्य प्रकारांना जागतिक स्तरावर रस आणि आकर्षण मिळत आहे हे पाहून आनंद होतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे