टाटा मोटर्सची नवी टियागो आणि टियागो ईव्ही २८ मे रोजी होणार लॉन्च
मुंबई, 23 मे (हिं.स.)। टाटा मोटर्स या स्वदेशी वाहन उत्पादक कंपनीने आपल्या अद्ययावत टियागो आणि टियागो ईव्ही या हॅचबॅक कारचे अनावरण केले असून या दोन्ही गाड्या २८ मे २०२६ रोजी अधिकृतपणे बाजारात दाखल होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नव्या फेसलिफ्ट
Tata Motors New Tiago Tiago EV Launch May 28


मुंबई, 23 मे (हिं.स.)। टाटा मोटर्स या स्वदेशी वाहन उत्पादक कंपनीने आपल्या अद्ययावत टियागो आणि टियागो ईव्ही या हॅचबॅक कारचे अनावरण केले असून या दोन्ही गाड्या २८ मे २०२६ रोजी अधिकृतपणे बाजारात दाखल होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नव्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कंपनीने बाह्य रचनेत मोठे बदल केले असून या गाड्या आता अधिक आकर्षक, दमदार आणि आधुनिक दिसत आहेत.

नव्या टियागो आणि टियागो ईव्हीमध्ये आयब्रो आकाराच्या एलईडी डीआरएलसह नव्या पद्धतीचे हेडलॅम्प देण्यात आले आहेत. पेट्रोल इंजिन असलेल्या मॉडेलमध्ये मोठ्या अल्ट्रोझसारखी काळ्या रंगाची ग्रिल देण्यात आली आहे, तर ईव्ही प्रकारात बॉडी कलर ब्लँक-ऑफ ग्रिल मिळते. दोन्ही गाड्यांचा पुढील बंपर पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आला असून पेट्रोल मॉडेलमध्ये पिक्सेल आकाराचे फॉग लॅम्प देण्यात आले आहेत. ईव्ही प्रकारात मात्र हे फॉग लॅम्प देण्यात आलेले नाहीत.

साईड प्रोफाइलमध्ये नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स देण्यात आले असून त्यांचा आकार १५ इंच असण्याची शक्यता आहे. दोन्ही गाड्यांमध्ये काळ्या रंगाचे व्हील आर्च देण्यात आले आहेत, जे टियागो एनआरजीसारखे दिसतात. मागील भागात व्हर्टिकल एलईडी स्ट्रिप्ससह नवीन टेललॅम्प देण्यात आले असून ते एका जाड एलईडी बारने जोडले गेले आहेत. मागील बंपरमध्येही बदल करण्यात आले असून दोन्ही मॉडेल्समध्ये ते एकसारखे ठेवण्यात आले आहेत.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये पुढील बंपर आणि ओआरव्हीएमच्या खाली कॅमेरा पॉड दिसत असून त्यामुळे नव्या ३६० डिग्री कॅमेरा प्रणालीची सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतील भागात नवीन डॅशबोर्ड, प्रकाशित लोगो असलेले स्टीयरिंग व्हील आणि १०.२५ इंचांची इन्फोटेन्मेंट स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय ऑटोमॅटिक हेडलाईट्स, ऑटोमॅटिक वायपर्स, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग प्रणालीसारखी फीचर्स कायम ठेवली जाणार आहेत. नव्या मॉडेलमध्ये दोनऐवजी सहा एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे.

टियागो पेट्रोल मॉडेलमध्ये १.२ लिटर नॅचरल अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन ८६ हॉर्सपॉवर ताकद आणि ११३ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. त्यासोबत ५ स्पीड मॅन्युअल किंवा ५ स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. सीएनजी प्रकारात ७५.५ हॉर्सपॉवर ताकद आणि ९६.५ न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.

टियागो ईव्हीमध्ये १९.२ किलोवॅट तास आणि २४ किलोवॅट तास असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. छोट्या बॅटरीसह २२३ किलोमीटरपर्यंत तर मोठ्या बॅटरीसह २९३ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. फेसलिफ्टनंतर या रेंजमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या टियागोची किंमत ४.६० लाख रुपयांपासून सुरू होते, तर टियागो ईव्हीची किंमत ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. नव्या फेसलिफ्ट मॉडेल्सच्या किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande