आयपीएल २०२६: श्रेयस अय्यरच्या शतकामुळे पंजाबचा विजय, प्लेऑफच्या शर्यतीत कायम
लखनऊ, 24 मे (हिं.स.)पंजाब किंग्सने अखेर आयपीएल २०२६ हंगामातील अंतिम साखळी सामन्यात विजय मिळवला. सलग सहा पराभवांनंतर, पंजाबने लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. पंजाबने प्रथम लखनऊला २० षटकांत ६ ग
श्रेयस अय्यर


लखनऊ, 24 मे (हिं.स.)पंजाब किंग्सने अखेर आयपीएल २०२६ हंगामातील अंतिम साखळी सामन्यात विजय मिळवला. सलग सहा पराभवांनंतर, पंजाबने लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. पंजाबने प्रथम लखनऊला २० षटकांत ६ गडी बाद १९६ धावांवर रोखले. त्यानंतर सलामीवीर प्रभसिमरन सिंगने ६९ धावांची शानदार खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५१ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावा करत आपले पहिले आयपीएल शतक झळकावले. पंजाबने हा सामना ७ गडी राखून जिंकला. पंजाबचे आता १५ गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी, संघाला राजस्थान रॉयल्सच्या पराभवाची आणि केकेआरचा नेट रन रेट त्यांच्यापेक्षा कमी असण्याची आशा करावी लागेल.

आपल्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ सुपर जायंट्सकडून सलामीवीर जोश इंग्लिसने सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी केली. मात्र, अर्शीन कुलकर्णी शून्यावर बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन केवळ दोन धावांवर बाद झाला, त्यामुळे लखनभची धावसंख्या २० धावांवर दोन गडी बाद अशी झाली. त्यानंतर इंग्लिस आणि आयुष बडोनी यांनी डाव सावरला. बडोनीने १८ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४३ धावांची वेगवान खेळी केली. या दोन फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली.

इंग्लिसने एक बाजू सांभाळत ४४ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांसह शानदार ७२ धावा केल्या. अखेरीस अब्दुल समदने २० चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. या खेळींमुळे लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकांत ६ गडी बाद १९६ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. पंजाब किंग्सकडून मार्को जानसेन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

१९७ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच चेंडूवर प्रियांश आर्या बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने ३९ चेंडूंमध्ये ६९ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर कूपर कॉनोलीने १८ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सूत्रे हाती घेतली आणि शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. अय्यरने ५१ चेंडूंमध्ये १०१ धावा करून पंजाबला १८ षटकांत विजय मिळवून दिला. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक होते आणि तेही एका महत्त्वपूर्ण सामन्यात. पंजाबच्या या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande