
रत्नागिरी, 27 मे (हिं.स.) । शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथे घडलेल्या सूरज झोरे याच्या खूनप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला असून, खुनासाठी वापरण्यात आलेला कोयता शहर पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींकडून करण्यात आलेल्या कसून चौकशीतून ही माहिती समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या कोयत्याबाबत माहिती दिली. त्यानुसार आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी रक्ताने माखलेला कोयता हस्तगत केला. हा कोयता आरोपींनी कुणाकडून आणला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सूरज राजाराम झोरे (वय २५, रा. विरार) याचा २१ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास साईनगर, कुवारबाव येथे कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सोहम एकनाथ म्हात्रे (१८, रा. शांतीनगर रसाळवाडी), अभिषेक देवानंद राठोड (२२, रा. आदिनाथनगर समोरील झोपडपट्टी) आणि नजीबुल शेख ऊर्फ सोनू (रा. शांतीनगर रसाळवाडी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या कोयत्यावर रक्ताचे डाग आढळून आले असून, त्यावरील रक्तनमुने तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तपासातून खूनप्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी