
पुणे, 31 मे (हिं.स.)। दौंड तालुक्यातील केडगाव येथे उघडकीस आलेल्या बहुचर्चित बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होत असून, यवत पोलिसांनी आणखी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागात गर्भलिंगनिदानाचे जाळे अधिक खोलवर रुजल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील डॉ. सुंदरम कदम आणि किकवी (ता. भोर) येथील डॉ. मंदार माळी यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याच्याकडून सुरू असलेल्या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या असून, त्याआधारे तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.या प्रकरणात बेकायदेशीररित्या सोनोग्राफी मशीनचा वापर करून गर्भलिंगनिदान केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान हे मशीन आरोपी नरेंद्र ठाकरे याने उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र ठाकरे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्याकडूनही चौकशी सुरू आहे.या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, डॉ. सुंदरम कदम आणि डॉ. मंदार माळी हे दोघेही फरार असून यवत पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव यांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे उरुळी कांचन आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांकडून डॉ. सुंदरम कदम यांच्या आर्थिक व्यवहारांची, मालमत्तेची आणि संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असल्याची चर्चा आहे.
गर्भलिंगनिदानासारख्या गंभीर आणि कायद्याने प्रतिबंधित गुन्ह्यांमधून आर्थिक फायदा मिळविण्यात आला आहे का, याचाही तपास करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु