
आंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेटचा भंडाफोड
नागपूर, २७ मे (हिं.स.) : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी यशस्वी कारवाई करत आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. उमरेड येथे दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी थेट झारखंड राज्यात धाड टाकून मुख्य पुरवठादाराला अटक केली. या कारवाईत तब्बल ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू, २३ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी ९२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर ग्रामीणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने २० मे रोजी उमरेड-नागपूर मार्गावरील उदासा उड्डाणपुलाजवळ संशयित ट्रकची तपासणी केली होती. या वेळी ट्रक चालकाकडून २३७.१७० ग्रॅम अफू, मोबाईल आणि ट्रक असा एकूण ३३ लाख ३१ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक माहिती, गुप्त तपास आणि सातत्यपूर्ण शोध मोहिमेद्वारे या तस्करीचे धागेदोरे झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यापर्यंत पोहोचले.
पोलिसांनी २५ मे रोजी सिमडेगा जिल्ह्यातील भंडारटोली परिसरात छापा टाकून मुख्य आरोपी मनीषकुमार अंबिकाप्रसाद (वय ४६), व्यवसायाने हॉटेल व्यावसायिक, याला अटक केली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता १ कोटी ६८ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा ३३ किलो ७६७ ग्रॅम अफूचा साठा आढळून आला.
याशिवाय घरातून २३ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिक पिशव्या आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ३४ किलो ४ ग्रॅम १७० मिलीग्रॅम अफू जप्त केला असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २ कोटी २५ लाख ६८ हजार ०८५ रुपयांवर पोहोचली आहे.
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांचे जाळे हादरले असून, या प्रकरणातील पुढील आणि मागील साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक सखोल तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी