
२२.५७ लाखांचा गंडा, चौघांविरुद्ध गुन्हा ; मुख्य संशयित राजू उर्फ प्रशांत बडगुजरला कोठडी
नाशिक, 27 मे (हिं.स.)। जमिनीच्या व्यवहारांमध्ये ‘सोन्याचे भाव’ असतानाच नाशिकमध्ये पुन्हा एकदा प्लॉट माफियांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून जळगावच्या एका व्यावसायिकाची तब्बल २२ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. स्वस्तात आणि खात्रीशीर प्लॉट देण्याचे आमिष, बनावट मालकांची उभी केलेली ओळख, तसेच खोट्या कागदपत्रांचा वापर करून हे संपूर्ण रॅकेट चालवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
या प्रकारामुळे नाशिकमधील जमीन व्यवहारांची विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेत आली असून, “प्लॉट माफिया” हे नाव नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. भालचंद्र यशवंत चौधरी (वय ५५, रा. एम.जे. कॉलेजजवळ, जळगाव) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर, रतन ससाणे आणि त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून नाशिकच्या गंगापूर शिवारातील एक प्लॉट विक्रीस असल्याचे भासवले.
“हा प्लॉट अत्यंत खात्रीशीर आहे, आज घेतला नाही तर दुसरा ग्राहक तयार आहे,” असा दबाव टाकत वारंवार बैठका घेऊन आरोपींनी विश्वास संपादन केला. या काळात रोख रक्कम, बँक ट्रान्सफर आणि चेकच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने एकूण २२ लाख ५७ हजार रुपये उकळण्यात आले.
व्यवहारादरम्यान आरोपींनी खोटे मालक दाखवणे, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि बोगस व्यवहार दाखवणे अशा प्रकारे संपूर्ण फसवणुकीचा कट रचल्याचे समोर आले आहे.
व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही प्लॉटची नोंदणी न करता आरोपींनी सतत टाळाटाळ केली. संशय वाढल्यानंतर फिर्यादीने स्वतः चौकशी केली असता धक्कादायक वास्तव उघड झाले—संबंधित प्लॉटचा मूळ मालक पूर्णपणे वेगळाच असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2) आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुख्य संशयित राजू उर्फ प्रशांत बडगुजर याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली असून मंगळवारी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV