अक्कलकोट तालुक्यात विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सात जणांवर गुन्हा
सोलापूर, 28 मे (हिं.स.)। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सासरच्या सात जणांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोल
अक्कलकोट तालुक्यात विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सात जणांवर गुन्हा


सोलापूर, 28 मे (हिं.स.)। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सासरच्या सात जणांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कलव्वा बसप्पा पुजारी (रा. भोसगा, जि. कलबुर्गी) यांनी फिर्याद दिली आहे. मृत महिलेचे नाव भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमणी (रा. मैंदर्गी) असून, तिने मुलगा शिवराज सिद्धप्पा कट्टीमणी याच्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले.

फिर्यादीनुसार, सासू तिप्पव्वा शरणप्पा कट्टीमणी, सासरे शरणप्पा कट्टीमणी, पती सिद्धप्पा शरणप्पा कट्टीमणी, दीर समर्थ शरणप्पा कट्टीमणी, नागनाथ शरणप्पा कट्टीमणी, यलप्पा शरणप्पा कट्टीमणी तसेच नणंद गंगव्वा शरणप्पा पुजारी (सर्व रा. मैंदर्गी) हे भाग्यश्री यांना सतत मानसिक त्रास देत होते. या छळाला कंटाळून त्यांनी मुलासह आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री यांनी मैंदर्गी येथील तोरणी रोडलगतच्या विहिरीत मुलासह उडी मारल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर शिवराजचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर शिवराजला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande