
नाशिक, 28 मे (हिं.स.) दस्त नोंदविण्याच्या वेळी मूळ महिलेऐवजी बनावट महिला उभी करून दस्तनोंदणी करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दस्तनोंदणी कार्यालयातील अधिकारी प्रकाश देवराम वाक्चौरे (रा. लासलगाव, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी लिहून देणार अनोळखी महिला, लिहून घेणार पृथ्वीराज युवराज पवार (रा. स्प्रिंग फिल्ड टॉवर, गंगापूर रोड), साक्षीदार चेतन गौतम नवले (रा. हरिदीप अपार्टमेंट, एन. डी. पटेल रोड), गौतम पंकज पवार (रा. आशिष बंगला, आग्रा रोड, नाशिक), रोहित दीपक पवार (रा. पवार वाडा, जुने नाशिक), हर्षल दिलीप सुराणा (रा. आशिष अपार्टमेंट, जुना आग्रा रोड) हे द्वारका सर्कल येथील कृषी औद्योगिक संघाच्या इमारतीत असलेल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी आलेले होते. जनरल मुखत्यारपत्र दस्त नोंदविताना नयना युवराज पवार या महिलेऐवजी कोणी तरी इतर महिला उभी करून ही नयना युवराज पवार असल्याचे भासवून त्यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र व कार्यालयात कबुलीजबाब देऊन दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केली. हा प्रकार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV