
जळगाव, 28 मे (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत असून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. मात्र सध्या ग्राहकांसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले असून आज पुन्हा एकदा दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल 2,000 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या दरातही सुमारे 4,000 रुपयांची घट झाली आहे. गेल्या पाच दिवसांत सोन्याचे दर सुमारे 4,000 रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल 12,000 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
सराफा व्यावसायिकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्या-चांदीतील गुंतवणुकीवर परिणाम झाला असून किमती घसरल्या आहेत.
आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹15,606 इतका नोंदवण्यात आला असून तो कालच्या तुलनेत ₹238 ने कमी आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर ₹14,305 प्रति ग्रॅम तर 18 कॅरेट सोन्याचा दर ₹11,704 प्रति ग्रॅम इतका आहे.
चांदीचा दर प्रति ग्रॅम ₹275 असून प्रति किलो चांदी ₹2,75,000 वर पोहोचली आहे. एका दिवसातच चांदीच्या दरात तब्बल ₹10,000 ची घसरण झाल्याचेही दिसून आले आहे.
दरम्यान, बकरीद निमित्त मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चे पहिले सत्र बंद असल्याने जागतिक संकेतांनुसार पुढील व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या किमतींची दिशा जागतिक घडामोडींवर अवलंबून राहणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर