पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वेगाडी लवकरच धावण्यासाठी सज्ज
* हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या निवडक देशांच्या गटात भारताने मिळवले स्थान नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) - हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय रेल्वे विभागाने उत्तर भारतातील रेल्वेच्या समर्पित जिंद-सोनी
स्वदेशी हायड्रोजन रेल्वेगाडी


* हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या निवडक देशांच्या गटात भारताने मिळवले स्थान

नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) -

हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय रेल्वे विभागाने उत्तर भारतातील रेल्वेच्या समर्पित जिंद-सोनीपत विभागात 10 डब्यांची हायड्रोजन फ्युएल सेल-आधारित रेल्वेगाडी सुरु करायला परवानगी दिली आहे. या गाडीचे परिचालन लवकरच सुरु होणार असून, 1200 किलोवॉटच्या हायड्रोजन फ्युएल सेल प्रोपल्शन प्रणालीने सुसज्ज असलेली ही गाडी प्रतितास 75 किमी अशा कमाल वेगाने धावू शकेल.

हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानामध्ये हायड्रोजनचा वापर करत रासायनिक क्रियेद्वारे वीज निर्मिती केली जाते आणि यात केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित होत असल्यामुळे ही गाडी पारंपरिक जीवाश्म इंधन-आधारित ट्रॅक्शन प्रणालीला एक स्वच्छ पर्याय ठरणार आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे प्रणालींना शाश्वत गतिमानतेसाठीचा आश्वासक पर्याय म्हणून जागतिक पातळीवर वाढत्या प्रमाणात मान्यता मिळत आहे. या उपक्रमासह भारत आता अधिक स्वच्छ रेल्वे वाहतुकीसाठी हायड्रोजनचा वापर करण्याच्या शक्यता आजमावत असलेल्या जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांसारख्या देशांच्या निवडक गटात सहभागी झाला आहे. हे तंत्रज्ञान अजून नवजात टप्प्यावर असून, अत्यंत मर्यादित संख्येतील देश सध्या अशा यंत्रणांचा वापर अथवा चाचणी करत आहेत.

हरियाणामधला जिंद-सोनीपत मार्ग प्रायोगिक मार्ग म्हणून निवडण्यात आला आहे. जिंद येथे या गाडीसाठी स्वदेशी हायड्रोजन साठा तसेच इंधन पुनर्भरण सुविधा उभारण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि स्फोटक पदार्थ सुरक्षा संघटनेने (पीईएसओ)या ठिकाणी कॉम्प्रेस्ड हायड्रोजन वायूची साठवण आणि वितरणासाठी आवश्यक परवाना दिला आहे.

संशोधन रचना आणि मानके संघटनेकडून (आरडीएसओ) मान्यता मिळालेली हायड्रोजन रेल्वे गाडी तसेच हायड्रोजन कारखाना यांच्यासाठीची परिचालन आणि देखभाल नियमावली देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.शकूरबस्ती येथील प्रस्तावित सुविधेच्या उभारणीत आवश्यक सुरक्षाविषयक तरतुदी, नियमित लेखापरीक्षणे तसेच प्रमाणित परिचालन प्रक्रियांची सुनिश्चिती करुन घेण्यात येत आहे.

या नव्या प्रयोगासाठी दिलेल्या परवानगीमध्ये व्यापक सुरक्षा आणि परिचालन नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये हायड्रोजन इंधन पुनर्भरण यंत्रणेचे अहोरात्र निरीक्षण, महत्त्वाच्या कार्यांसाठी प्रशिक्षित आणि प्रमाणित कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि नियमित तपासणी तसेच देखभाल वेळापत्रक या घटकांचा समावेश आहे.

या प्रकल्पातून नवोन्मेष, उर्जा कार्यक्षमता तसेच पर्यावरणदृष्ट्या शाश्वत वाहतूक व्यवस्थेप्रती रेल्वेच्या अधिक विस्तृत कटिबद्धतेचे दर्शन घडते आणि हा प्रकल्प भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ उर्जा अभियान तसेच शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्टांना पाठबळ पुरवतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande