

जालना, 31 मे (हिं.स.) : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चर्चा झाली. अभ्यासकांच्या सूचना सरकारने मान्य केल्यानंतर मंत्री विखे पाटील आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास पाणी पिऊन उपोषण आंदोलन मागे घेतले.
मराठा आरक्षण आणि तदानुषंगिक मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक होत जरांगेंनी भर उन्हात बसून आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. उन्हाच्या कडाक्याने तडफडून मेलो तर जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आ. प्रसाद लाड आणि सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भेटून चर्चा केली मात्र जरांगे त्यांच्या आंदोलनावर ठाम होते.
चर्चेची अनेक सत्रे सुरू होती. त्या दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसंच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. आमच्या मागण्यांवर सरकारने दिलेल्या ड्राफ्टवरून मंगळवारपर्यंत आदेश काढायची तयारी सरकारने दाखवल्याने उपोषण स्थगित केलं आहे, अशी घोषणा जरांगेंनी केली. तसेच सातारा गॅझेटीयर साठी सरकारला एक महिना वेळ द्यायला हरकत नाही. पण तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढण्यात येतील. आता जर थांबले तर आम्ही मंत्री विखे पाटील आणि प्रसाद लाड या दोघांना जबाबदार धरणार, असा इशाराही जरांगेंनी यावेळी दिला.
चर्चा यशस्वी; उपोषणाला स्थगिती दिल्याबद्दल मनोज जरांगे यांचे धन्यवाद ! - विखे पाटील
मंत्री विखे पाटील यांनी म्हटले की, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जरांगे यांचे राज्य सरकारच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद ! मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, तसेच सर्व प्रश्न संविधानिक आणि कायदेशीर चौकटीत मार्गी लागावेत, यासाठी शासन कटिबद्ध असून संवादाच्या माध्यमातून सर्व संबंधित मुद्द्यांवर सहमतीचे व सकारात्मक मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी