
लातूर, 28 मे (हिं.स.)। एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत माधवराव मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) गोविंद रंगनाथ डुरे (वय २८, रा. टाकळी, ता. जि. लातूर), २) सिद्धू माने (रा. आर्वी, ता. जि. लातूर) व ३) विकास हिंगे (रा. हरगुंळ बु., ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९१/२०२६ अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/२५, ५/२५ तसेच कलम ३(५) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २७ मे २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने बकरी ईदच्या अनुषंगाने कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते. त्यावेळी दोन इसम स्कुटी क्रमांक एमएच-२४-सीई-४६४३ वरून नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशनकडे सर्व्हिस रोडने गावठी पिस्तूल विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती पोउपनि मोरे व डीबी पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे हॉटेल विश्वगार्डन सर्व्हिस रोड परिसरात सापळा रचून अचानक छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी गोविंद रंगनाथ डुरे हा अनाधिकृत गावठी पिस्तूलासह आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोउपनि श्रीकांत मोरे, डीबी पथकाचे पोलीस हवालदार बळवंत भोसले, राजाभाऊ म्हस्के व सचिन गिरी यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis