

पाटणा, 28 मे (हिं.स.) - येथील बाढ येथे गंगेत बोट उलटल्याने तीन जणांचा बुडून मृत्यू झाला, तर 4 जण बेपत्ता असून अन्य 7 जणांना वाचवण्यात आले आहे. बोटीत सुमारे १४ लोक होते. ज्यात बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश होता. हा अपघात बाढ येथील उमानाथ परिसरात झाला आहे. मृतांची ओळख नीलम कुमारी (30), श्रवण महतो (36) आणि काशी कुमार (15) अशी झाली आहे. श्रवण आणि काशी हे बाप-लेक होते. जखमींमध्ये राहुल कुमार, ममता देवी, कबूतरी कुमारी आणि 16 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी यांचा समावेश आहे. उर्वरित 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. बोटीत असलेले सर्व लोक बाढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूमगंज बिंद टोलीचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ५:४५ वाजता बिंद टोळीतील १४ लोक बोटीने जि. समस्तीपूर येथील सुलतानपूर दियारा येथे गेले होते. पुरामुळे लोक अनेकदा भाजीपाला तोडणे आणि शेतीच्या कामासाठी त्या भागात जातात. परत येताना वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आणि क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे बोट उलटली. बोटीवर बचावासाठीची उपकरणेही नव्हती.
बोटीत बसलेल्या लोकांनी सांगितले की, जशी बोट नदीच्या मधोमध प्रवाहात पोहोचली, ती डगमगू लागली. आम्ही काही समजण्यापूर्वीच बोट नदीत बुडाली. प्रवाह इतका वेगवान होता की काही प्रवासी वाहून गेले, त्यांना वाचवण्याची संधीही मिळाली नाही. बुडणारी बोट पाहून आसपासच्या मच्छीमारांनी आणि स्थानिक पाणबुड्यांनी गंगेत उडी मारली आणि 7 लोकांना वाचवले. या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. पाच लोकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या टीमने बचाव केला.
घटनेची माहिती मिळताच, बाढ विभागाचे स्टेशन प्रमुख ब्रजकिशोर सिंह, एसडीपीओ रामकृष्ण, एसडीएम गरिमा लोहिया आणि विभागीय अधिकारी डॉ. नरेंद्र कुमार सिंह यांच्यासह डझनभर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी