
नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.)भाजपने दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षांची जागा बदलली आहे. पक्षाने या चार राज्यांसाठी नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. दिल्लीत हर्ष मल्होत्रा, हरियाणात अर्चना गुप्ता, पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लन आणि त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीत, अर्चना गुप्ता यांची हरियाणात, सरदार केवल सिंग ढिल्लन यांची पंजाबमध्ये आणि अभिषेक देबरॉय यांची त्रिपुरात भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
हर्ष मल्होत्रा हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे खासदार आहेत. भाजपने गौतम गंभीर यांच्या जागी त्यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे. ते केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदावर आहेत. पक्षाच्या संघटनात्मक राजकारणातील एक जुने सदस्य असलेल्या मल्होत्रा यांनी दिल्ली भाजपमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते जनसंपर्क, संघटनात्मक क्षमता आणि विकासविषयक बाबींमधील त्यांच्या सक्रिय भूमिकेसाठी ओळखले जातात. हर्ष मल्होत्रा दिल्लीत वीरेंद्र सचदेवा यांची जागा घेतील. वीरेंद्र सचदेवा यांनी यापूर्वी दिल्ली भाजप अध्यक्षपद भूषवले होते.
डॉ. अर्चना गुप्ता या हरियाणातील एक सक्रिय भाजप नेत्या आणि डॉक्टर आहेत. संघटनात्मक राजकारणावर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत आणि महिला नेतृत्व मजबूत करण्यात भूमिका बजावली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्या संघटनेचा विस्तार करतील आणि पक्षाचे कार्यकर्ते अधिक मजबूत करतील अशी अपेक्षा आहे.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरदार केवल सिंग ढिल्लन यांची पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते बरनाला मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत आणि राज्यात विकासाला नेहमीच प्राधान्य देणारे नेते म्हणून ओळखले जातात. विकासाशी संबंधित कामात ते तडजोड न करणारे असल्याचे म्हटले जाते.
त्रिपुरा भाजपचे सक्रिय नेते अभिषेक देबरॉय यांची आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते संघटनेत बऱ्याच काळापासून कार्यरत असून त्यांनी पक्षाच्या विविध प्रचार मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी संघटना मजबूत करावी आणि त्रिपुरामध्ये पक्षाचा पाठिंबा वाढवावा, अशी पक्षाच्या नेतृत्वाला अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे