भारतीय हस्तिदंताची अवैध तस्करी - एकूण 4 किलो वजनाच्या हस्तिदंतासह तिघे ताब्यात
नागपूर, 28 मे (हिं.स.) - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने (डीआरआय, एनएआरयु) नुकतीच कर्नाटकात म्हैसूर येथे भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा (हस्तिदंत) अवैध व्यापार करण्यात सहभागी असलेली बेकायदेशी
हस्तिदंत तस्करी


नागपूर, 28 मे (हिं.स.) -

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने (डीआरआय, एनएआरयु) नुकतीच कर्नाटकात म्हैसूर येथे भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा (हस्तिदंत) अवैध व्यापार करण्यात सहभागी असलेली बेकायदेशीर वन्यजीव तस्करी टोळीचा उघडकीला आणली.

या कारवाईदरम्यान भारतीय हत्तीच्या सुळ्यांचे अवैध व्यवहार आणि व्यापारातील सहभागाबद्दल तीन व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 4.058 किलो वजनाचे भारतीय हत्तीचे हस्तिदंत ताब्यात घेण्यात आले.

भारतीय हत्ती (शास्त्रीय नाव एलिफस मॅक्झिमस) हा वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची I अंतर्गत सूचीबद्ध असून अशा प्राण्यांचा आणि त्यांच्यापासून मिळवलेल्या वस्तूंचा व्यापार या कायद्यान्वये प्रतिबंधित आहे.

जप्तीच्या कारवाईची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, जप्त केलेल्या हत्तीच्या सुळ्यांसह अटक करण्यात आलेल्या तिघांना, वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या संबंधित तरतुदींखाली पुढील आवश्यक कारवाईसाठी, म्हैसूर क्षेत्रीय हद्दीच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

आशियाई हस्तिदंताच्या मऊपणामुळे कोरीवकाम करणाऱ्या कारागिरांकडून त्याला अधिक प्राधान्य दिले जाते. या गुणधर्मामुळे अशा हस्तिदंतावर गुंतागुंतीच्या रचना आणि कलाकुसर करणे सोपे होते. काही जागतिक बाजारपेठांमध्ये गुंतागुंतीचे कोरीवकाम केलेल्या आशियाई हस्तिदंताला प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून मोठी किंमत दिली जाते. आशियाई हस्तिदंताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर जगामध्ये बंदी घातलेली असली तरीही त्याला अवैधरीत्या मोठी मागणी आहे.

डीआरआयने अशा अनेक अवैध वन्यजीव तस्करी जाळ्यांचा बीमोड केलेला आहे आणि या सातत्यपूर्ण अंमलबजावणी कारवायांतून डीआरआयची सततची दक्षता, वन्यजीव संरक्षणाप्रती बांधिलकी आणि संघटीत पर्यावरणीय गुन्ह्यांना आळा घालण्याचा अढळ निर्धार अधोरेखित होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande