काकोली घोष यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, कल्याण बॅनर्जींवर गैरवर्तनाचा आरोप
कोलकाता, 28 मे (हिं.स.)पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यापासून, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमधील मतभेदांच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता हे मतभेद सार्वजनिक झाले आहेत. टीएमसी नेत्या काकोली घोष यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना
काकोली घोष यांचा संग्रहित फोटो


कोलकाता, 28 मे (हिं.स.)पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यापासून, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमधील मतभेदांच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता हे मतभेद सार्वजनिक झाले आहेत. टीएमसी नेत्या काकोली घोष यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या पत्रात, घोष यांनी आपल्या पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे परवानगी मागितली आहे.

२८ मे २०२६ रोजीच्या या पत्रात, काकोली घोष दस्तीदार यांनी आरोप केला आहे की, कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेत त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली. घोष यांनी दावा केला आहे की, कल्याण बॅनर्जी यांचे वर्तन केवळ त्यांच्यापुरतेच नव्हे, तर इतर महिला खासदारांप्रतिही अयोग्य आणि अनादरपूर्ण राहिले आहे. आपल्या पत्रात, घोष यांनी लोकसभा अध्यक्षांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे आणि औपचारिक तक्रार दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. काकोली घोष यांनी योग्य कारवाई करून शिक्षा सुनिश्चित करण्याची मागणीही केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी बुधवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. दुसऱ्या दिवशी, त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याबद्दल तक्रार केली, ज्यामुळे टीएमसीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे संकेत मिळाले. काकोली घोष दस्तीदार यांना अलीकडेच टीएमसीच्या लोकसभा प्रतोद पदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून काकोली घोष पक्ष आणि कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात वक्तव्ये करत असल्याचे मानले जाते. पण, त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्या तृणमूल काँग्रेस सोडत नाहीत. त्या बंगाल आणि तेथील जनतेच्या हितासाठी एक सामान्य कार्यकर्त्या म्हणून पक्षाशी संबंधित राहतील. काकोली घोष यांनी टीएमसीमधील आय-पॅकच्या वाढत्या प्रभावावर आणि पक्षांतर्गत अलोकतांत्रिक व अपारदर्शक कार्यपद्धतीवरही टीका केली.

ककोली घोष भाजपमध्ये सामील होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभेतील पक्षाचे नवे मुख्य प्रतोद कल्याण बॅनर्जी यांच्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. कल्याण बॅनर्जी यांनी लिहिले, तुमचा पुढील प्रवास सुखकर आणि आरामदायक होवो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांनी पुढे लिहिले, कदाचित आता तुमच्याभोवतीचे सर्व डाग आणि वाद अखेर धुऊन जातील आणि सर्व काही स्पष्ट होईल. हार्दिक शुभेच्छा, जिथे पूर्वीची सर्व स्पष्टीकरणे अयशस्वी ठरली, तिथे हे नवीन पर्व यशस्वी होवो.

कल्याण बॅनर्जी यांच्याबद्दल तक्रार करणाऱ्या टीएमसी खासदार काकोली घोष यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्राला भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजप खासदार राहुल सिन्हा म्हणाले, ही काकोली घोष यांची वैयक्तिक बाब आणि त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. आम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. आमचे लक्ष बंगालच्या विकासावर आहे. टीएमसीच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande